श्रीक्षेत्र वीर येथे पावसाचा कहर; मंदिरासमोरील पूर्णगंगा नदी दुतर्फा खळाळून वाहिली | पुढारी

श्रीक्षेत्र वीर येथे पावसाचा कहर; मंदिरासमोरील पूर्णगंगा नदी दुतर्फा खळाळून वाहिली

परिंचे; पुढारी वृत्तसेवा: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) परिसरात पावसाने गेल्या पाच दिवसांपासून अक्षरशः कहर केला आहे. श्रीक्षेत्र वीर, परिंचे, लपतळवाडी, तोंडल, यादववाडी, पांगारे, तसेच काळदरी खोरे यातही अनेक वाड्या-वस्त्यासहित सर्व ठिकाणी वरुणराजाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मंदिरासमोरील पूर्णगंगा नदीही दुतर्फा खळाळून वाहत आहे.

जोरदार पावसाने अनेक ठिकाणी रस्तेही खचलेले आहेत. अनेक शेतात पाणी साठून शेतकर्‍यांचा हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची वेळ आली आहे. प्रशासन मात्र कासवाच्या गतीने काम करीत आहे. अनेक ठिकाणी पंचनामेही सुरू असून, शेतकरी सरकारच्या तोकड्या मदतीचे स्वप्न पाहत आहेत. वीर परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मेघराजा तुडुंब बरसत आहे.

त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झालेला आहे. अनेक शेतकर्‍यांचे टोमॅटोचे प्लॉट भुईसपाट झाले असून, बाजरीची पिकेही जाण्याचा धोका आहे. सकाळपासून दुपारपर्यंत उकाड्याने हैराण व दुपारनंतर जोरदार पाऊस, असे गेले चार दिवस नित्याचेच झाले आहे. त्यामुळे मेघराजाला पाऊस पडू दे, पण विनाशकारी नको, अशी विनवणी शेतकरी करीत आहेत.

Back to top button