पुणे : कोंढापुरीत दोन कुटुंबांना चोरट्यांनी लुटले | पुढारी

पुणे : कोंढापुरीत दोन कुटुंबांना चोरट्यांनी लुटले

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे मंगळवारी पहाटे दोन घरांत घुसून तीन चोरट्यांनी हत्यारांच्या धाकाने लूट केली. या घरांतून दागिने व रोख रकमेसह एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांली चोरून नेला.

संतोष उत्तरेश्वर जगताप (वय 37, रा. कवठीमळा, कोंढापुरी) यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील कवठीमळा येथे राहणारे संतोष जगताप हे कुटुंबीयांसह घरात झोपले असताना पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा खोलून आत प्रवेश केला. त्यांनी जगताप यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवत पत्नीच्या अंगावरील तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व पन्नास हजार रुपये आणि दोघांचे मोबाईल घेऊन घराला बाहेरून कडी लावून घेतली.

त्यानंतर जगताप यांच्या शेजारी राहणार्‍या गणेश घरत यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. गणेश व त्यांच्या आईला कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी दोन्ही घरांतून एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज लुटून तेथून पोबारा केला. सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक रोहिदास पारखे तपास करीत आहेत.

Back to top button