‘हे’ गाणे गायल्याने होतो मृत्यू? | पुढारी

‘हे’ गाणे गायल्याने होतो मृत्यू?

मनिला ः अनेक वेळा आपण अशा काही गोष्टींबद्दल ऐकतो, ज्या पाहिल्यावर किंव ऐकल्यावर आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आज अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेऊया. जगात एक असे गाणे आहे, जे गायल्यास स्टेजवर गाणार्‍याचा म्हणजेच गायकाचा मृत्यू होतो, असे मानले जाते. या एका गाण्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यामुळेच हे गाणे ‘किलर साँग’ म्हणून ओळखले जाते. गाणे गायल्यामुळे मृत्यू नेमका का होतो? आणि ते गाणे नेमके कोणते आहे? आतापर्यंत किती लोकांचा या गाण्यामुळे मृत्यू झाला आहे? या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

एका रिपोर्टनुसार, हे गाणं आग्नेय आशियाई देश असलेल्या फिलिपाईन्सचे आहे. हे गाणे जगातील सर्वात धोकादायक गाणे म्हणून ओळखले जाते आणि या गाण्याचे शीर्षक आहे ‘माय वे साँग’. या गाण्याला फिलिपाईन्सचे ‘किलिंग साँग’ म्हणतात. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवर हे गाणे गाणार्‍या 12 गायकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हे गाणे गाणारा प्रत्येक व्यक्ती मृत्यूला बळी ठरतो, असा दावा केला जातो.

असे असूनही फिलिपाईन्समध्ये या गाण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही, मात्र तिथे राहणारे लोक आजही या गाण्याची भीती बाळगून आहेत. हे गाणे गुणगुणण्याआधीच लोक घाबरतात. या गाण्यावर सध्या काही बारमध्ये देखील बंदी आहे. 90 च्या दशकात हे गाणं गाणार्‍या गायकाची हत्या केली जायची. डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत एका पॉडकास्टरने म्हटले होते की, हे गाणे सामान्य नागरिकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करते. गाणे ऐकण्यासाठी अनेक जण शस्त्रं घेऊनही जातात. हे गाणं ऐकणारा गाणे ऐकून इतका उत्तेजित होतो की तो हिंसा करू लागतो. अनेकवेळा तो दारूच्या नशेत असतो आणि त्यामुळे तो समोरच्या व्यक्तीलाही मारतो.

या गाण्याच्या ओळी गाणे ऐकणार्‍यांमध्ये राग जागृत करतात, या रागात गाणे ऐकणारा काय करतो याचे त्याला स्वत:ला भान राहत नाही. या गाण्याच्या ओळींमध्ये हिंसा आहे, जी एखाद्या व्यक्तीला खुनासाठी प्रवृत्त करते. यामुळेच आतापर्यंत 12 गायकांचा गाण्याच्या कार्यक्रमादरम्यानच मृत्यू झाला आहे.

Back to top button