पुणे : तलवारीने वार करून दूध विक्रेत्याला लुटले | पुढारी

पुणे : तलवारीने वार करून दूध विक्रेत्याला लुटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तलवारीने वार करून तिघांनी दूध विक्रेत्याला लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास माणिकबाग (सिंहगड रोड) परिसरात घडली. या प्रकरणी स्वप्निल पायगुडे (वय 29, रा. डोणजे, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल व त्यांचा एक साथीदार दूध विक्रीतून आलेली रोकड मोजून बॅगेत ठेवत होते.

माणिकबाग येथील विनायक ट्रेडर्स दुकानासमोर दोघे थांबले होते. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन व्यक्ती तेथे आल्या. त्यातील एकाने स्वप्निलच्या हातावर तलवारीने वार करून, इतरांनी धमकावून 14 हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावली. स्वप्निलच्या सहका-याचा मोबाईलही चोरट्यांनी हिसकावला. 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर स्वप्निलने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकम करीत आहेत.

Back to top button