पुणे : एकल महिलांनी विस्तारले स्वत:चे आकाश | पुढारी

पुणे : एकल महिलांनी विस्तारले स्वत:चे आकाश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरात एकल महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पतीचे निधन, कुटुंबातील दुरावा, तर काहींनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतल्याने त्या एकाकी आहेत. परंतु, हिंमत न हारता त्यांनी स्वत:चे आकाश केवळ शोधले नसून, ते विस्तारले आहे. काहींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून, त्याला ऑनलाइनची जोड देत काहींनी तो जगभरात नेला आहे. 18 वर्षांच्या तरुणींपासून ते 80 वर्षांच्या वयोवृद्ध महिलांपर्यंत अनेकजणी एकाकी आयुष्य जगत आहेत.

एकटेपणामुळे काहींच्या आयुष्यात नैराश्य आले होते. पण, या निराशेला बाजूला सारून आता त्यांनी वेगळा अवकाश शोधला आहे. काहींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून, त्याला ऑनलाइनची जोड दिली आहे. त्यामुळेच आज त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या विक्री, साडी-दागिन्यांच्या विक्रीसह अनेकजणी कला शिक्षणाचे वर्ग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. अनेकींनी तर फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ऑनलाइन वस्तूविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

पुण्यात स्थापन झाला गट…
पुण्यात एकल राहणार्‍या महिला-तरुणींचे सपोर्ट ग्रुपही स्थापन झाले आहेत. त्यातीलच एक अभया सखी गट. वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटाच्या मीनाक्षी नवले म्हणाल्या, ‘पुण्यात गटाच्या माध्यमातून आम्ही एकट्या राहणार्‍या महिला-तरुणींसाठी काम करीत आहोत. पुण्यात सुमारे 300 महिला-तरुणी या गटाच्या सदस्या आहेत. त्यांना एकटे पडू न देणे, मानसिक आधार देणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशिक्षण देणे, त्यांचे सुख-दु:ख वाटणे आणि त्यांचे म्हणणे ऐकणे, असे काम या गटाद्वारे केले जात आहे. सध्या काहीजणी स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. अनेकींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून, आम्ही त्यांना व्यावसायिक मार्गदर्शनही करतो.’

खानावळीपासून पुस्तकविक्रीपर्यंत…
काहीजणी कपड्यांच्या विक्रीपासून ते खानावळी चालविण्यापर्यंतचा व्यवसाय करीत आहेत, तर काहींनी आर्थिक मोबदला मिळावा, यासाठी ऑनलाइन वस्तूंची विक्री सुरू केली आहे. कोरोनामुळे अनेकींना नोकरी गमवावी लागली, तर काहींना व्यवसायात अडचणी आल्या. पण, आता त्या स्वत: मेहनत करून पुन्हा एकदा व्यवसाय करीत आहेत. खानावळ, भाजी विकणे, मसाले-लोणचे विकण्यासह ग्राफिक डिझायनिंगपासून ते लेखनापर्यंतची कामे त्या करीत आहेत.

मी अविवाहित आहे आणि काही वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यामुळे सध्या मी एकटीच राहते. एकाकीपणामुळे आयुष्यात निराशाही आली. पण, आता ते बाजूला सारून मी व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभी आहे. मी साडीविक्रीचा व्यवसाय सुरू केला असून, त्यातून मला चांगला आर्थिक मोबदला मिळत आहे.
                                                                                              – वर्षा कदम

 

 

Back to top button