पुणे : डिंभे धरणात 50 टक्के पाणीसाठा | पुढारी

पुणे : डिंभे धरणात 50 टक्के पाणीसाठा

मंचर, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासह भीमाशंकर परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 50 टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी तान्हाजी चिखले यांनी दिली. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे ओढे, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे डिंभे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, धरण 50 टक्के भरले आहे. अनेक गावांच्या पाणीयोजना घोडनदीवर अवलंबून असून त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

घोडनदीच्या पात्रातील पाणीपातळीत वाढ झाली असून नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी खबरदारी म्हणून नदीपात्रातील विजेच्या मोटारी काढल्या आहेत. डिंभे धरणाचा फायदा आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, नगर, कडा, आष्टी, जामखेड, कर्जत आदी भागाला होतो. धरण भरल्यानंतर शेतीला आणि पिण्यासाठी पाणी बाराही महिने सोडले जाते. सध्या धरण परिसरात पावसाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. गतवर्षी 16 जुलै रोजी धरणात फक्त 25 टक्के पाणीसाठा होता. यंदा 50.66 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता दत्ता कोकणे यांनी दिली.

Back to top button