पुण्यात नव्या व्हेरियंटचे 43 रुग्ण; 31 मे ते 30 जूनदरम्यानचे रुग्ण | पुढारी

पुण्यात नव्या व्हेरियंटचे 43 रुग्ण; 31 मे ते 30 जूनदरम्यानचे रुग्ण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांचे पुण्यात निदान झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंटचे 35, तर बी ए. 2.75 चे 8 असे एकूण 43 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज पाचशेच्या आसपास आढळून येत आहे. मात्र, त्यांना सौम्य लक्षणे असून, गृहविलगीकरणातच रुग्ण बरे होत आहेत. राज्याच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बी ए. 4 चे चार, तर बी ए. 5 व्हेरियंटचे 31 आणि बीए. 2.75 व्हेरियंटचे आठ असे एकूण 43 रुग्ण आढळले आहेत.

हे सर्व रुग्ण पुण्यातील असून, या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉगअंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे. हे नमुने 31 मे ते 30 जून या काळातील आहेत. या रुग्णांचा सखोल आढावा साथरोग विभागाकडून घेतला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत बीए. 4 आणि बीए. 5 रुग्णांची संख्या 113, तर बीए. 2.75 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 40 झाली आहे.

जिल्हानिहाय विचार केल्यास बीए. 4 आणि बीए. 5 व्हेरियंटचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 65, मुंबई 33. नागपूर, ठाणे, पालघर जिल्ह्यात प्रत्येकी 3 आणि रायगड जिल्ह्यात 3 रुग्ण आढळले आहेत. तसेच बी ए. 2.75 या व्हेरियंटचे पुणे जिल्ह्यात 20, नागपूर 14, अकोला 4, ठाणे, यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

Back to top button