कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत : प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख | पुढारी

कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत : प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘कारागृहातून बाहेर पडताना तो चांगली व्यक्ती म्हणून बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यामुळे कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत,’ असे मत पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी व्यक्त केले. कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळातर्फे ‘प्रेरणा पथ’ उपक्रम सुरू आहे.

याअंतर्गत बालाजी मोरे याला शिक्षा भोगून आल्यानंतर चहा व स्नॅक्स स्टॉल सुरू करून देण्यात आला. या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य कारागृह सुधार सेवा व पुनर्वसन विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, कोर्ट मॅनेजर डॉ. अतुल झेंडे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, शिवराज कदम, अ‍ॅड. राणी कांबळे, अ‍ॅड. चित्रा जानुगडे आदी उपास्थित होते.

गुन्हेगार सुधारण्यासाठी उपक्रम पथदर्शी
सुनील रामानंद म्हणाले की, “गुन्हेगार सुधारण्यासाठी त्याच्या कुटुंबाचा भविष्याचा विचार करून या बंद्याना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणा पथ उपक्रम हा पथदर्शी ठरत असून, लवकरच हा संपूर्ण राज्यभर राबवण्यासंबंधी विचार करण्यात येणार आहे. महात्मा गांधींनीदेखील कैद्यांना सुधारणा करण्यासाठी अनेक सूचना सुचविलेल्या होत्या. ‘दो आँखें बारा हात’ हा चित्रपट डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प काम करीत आहे.”

Back to top button