‘माळेगाव’च्या सभासदांसाठी ‘शरद ऊस समृद्धी’; 10 ते 12 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट | पुढारी

‘माळेगाव’च्या सभासदांसाठी ‘शरद ऊस समृद्धी’; 10 ते 12 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा: सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सरासरी 6 ते 8 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होत आहे. तथापि हे उत्पादन 10 ते 12 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यासाठी माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने शरद ऊस समृद्धी बक्षीस योजना राबविण्याचे धोरण आखले आहे. यामध्ये कारखाना प्रशासनाने ठरविल्यानुसार एकरी ऊस उत्पादन घेतल्यास संबंधित ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा बक्षीस देऊन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गौरव करण्याचे निश्चित केले आहे.

अशी असेल शरद ऊस समृद्धी बक्षीस योजना
1) कारखान्याच्या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे ऊस क्षेत्राची कारखान्याकडे नोंद असणे गरजेचे आहे.
2) एका सभासदास ऊस लागवडीच्या आडसाली, पूर्व हंगाम, सुरू व खोडवा या चारही हंगामासाठी सहभाग घेता येईल; मात्र त्यासाठी प्रति हंगाम 1 हजार रुपये कारखान्याकडे भरावे लागतील.
3) योजनेत सहभागी होण्यासाठी ऊस लागण केल्यानंतर किंवा खोडवा ठेवल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कारखाना ऊस विकास विभागात नोंद करणे आवश्यक आहे.
4) सहभागी सभासदांची ऊसतोड नियमाप्रमाणे कारखान्यामार्फत देखरेखीखाली केली जाईल.

शरद ऊस समृद्धी बक्षिस योजना

अ. नं. ऊस लागण हंगाम ऊस लागवडीचा महिना प्रतिएकरी ऊस उत्पादन (मे. टन) बक्षीस रक्कम रूपये
1 आडसाली जून, जुलै, ऑगस्ट 1 115 मे. टन किंवा त्यापेक्षा जास्त 2) 100 मे. टन किंवा त्योपक्षा जास्त 35000/-
2 पूर्व हंगाम सप्टेंबर, ऑक्टोबर 85 किंवा त्यापेक्षा जास्त 25000/-
3 सुरु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 75 किंवा त्यापेक्षा जास्त 15000/-
4 खोडवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 65 किंवा त्यापेक्षा जास्त 20000/-
खोडवा फेब्रुवारी ते कारखाना बंद होईपर्यंत तुटलेला ऊसाचा खोडवा 60 किंवा त्यापेक्षा जास्त 15000/-
5 निडवा संपूर्ण लागण हंगामातील निडवा 55 किंवा त्यापेक्षा जास्त 15000/-

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य हे उत्तम ऊस पीक व कारखाना यावर अवलंबून असते. त्यामुळे एकरी अधिकचे ऊस उत्पादन घेणे महत्त्वाचे ठरते. यासाठी शरद ऊस समृद्धी योजना राबवण्याचे ठरविले आहे. सभासदांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीबरोबर कारखान्याचे गाळप उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

                     – बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना

जमिनीची स्थायी उत्पादन क्षमता, उपलब्ध नैसर्गिक घटक, खर्च करण्याची क्षमता व ऊस उत्पादन वाढीतील नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण आपल्या सभासदांमध्ये जागृती करून 10 ते 12 लाख मेट्रिक टन ऊस निर्माण करू शकतो.

               – सुरेश काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी, माळेगाव साखर कारखाना

हेही वाचा

परप्रांतीय मूर्तीकारांना मारहाण

जिल्ह्यात शेतकर्‍यांना एफआरपीचे 3720 कोटी; पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाची माहिती

बेळगाव : अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार

Back to top button