जिल्ह्यात शेतकर्‍यांना एफआरपीचे 3720 कोटी; पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाची माहिती | पुढारी

जिल्ह्यात शेतकर्‍यांना एफआरपीचे 3720 कोटी; पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ऊस गाळप हंगाम संपुष्टात आला असून, पुणे जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर एफआरपीच्या रकमेपोटी 3 हजार 720 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना देय एफआरपीची एकूण रक्कम 3 हजार 478 कोटी रुपये असून त्यापेक्षा अधिक म्हणजे 242 कोटी रुपयांइतकी रक्कम कारखान्यांनी शेतकर्‍यांना दिली असल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातून मिळाली. जिल्ह्यात 10 सहकारी आणि 6 मिळून एकूण 16 साखर कारखान्यांनी 154 लाख 91 हजार 752 टनांइतके उच्चांकी ऊस गाळप पूर्ण केले आहे. त्यापोटी उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची (एफआरपी) रक्कम देण्याचे प्रमाण चांगले राहिले असल्याचे 15 जूनअखेरच्या ताज्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.
कारखानानिहाय एफआरपीची स्थिती: 
कारखाना एफआरपीची एकूण शेतकर्‍यांना प्रत्यक्षात टक्केवारी
देय रक्कम दिलेली रक्कम (रक्कम कोटी रुपयांत)
भीमाशंकर सहकारी 269.98 कोटी 310.01 कोटी 114.83 टक्के
माळेगाव सहकारी 351.61 कोटी 424.48 कोटी 120.72 टक्के
विघ्नहर सहकारी 261.04 कोटी 262.93 कोटी 100.73 टक्के
कर्मयोगी सहकारी 249.09 कोटी 190.36 कोटी 76.42 टक्के
श्री सोमेश्वर सहकारी 304.25 कोटी 379.99 कोटी 124.89 टक्के
श्री संत तुकाराम सहकारी 129.83 कोटी 141.20 कोटी 108.76 टक्के
श्री छत्रपती सहकारी 285.85 कोटी 300.43 कोटी 105.10 टक्के
रावसाहेबदादा पवार 139.84 कोटी 138.81 कोटी 99.27 टक्के
घोडगंगा सहकारी निरा-भीमा सहकारी 165.82 कोटी 134.74 कोटी 81.26 टक्के
राजगड सहकारी 42.01 कोटी 20.75 कोटी 49.39 टक्के
व्यंकटेशकृपा खासगी 159.00 कोटी 188.77 कोटी 118.72 टक्के
श्रीनाथ म्हस्कोबा खासगी 181.99 कोटी 213.72 कोटी 117.43 टक्के
अनुराज शुगर्स 111.28 कोटी 89.65 कोटी 80.56 टक्के
पराग अ‍ॅग्रो फूड्स 179.84 कोटी 198.42 कोटी 110.33 टक्के
दौंड शुगर 276.41 कोटी 327.92 कोटी 118.64 टक्के
बारामती अ‍ॅग्रा 370.90 कोटी 398.14 कोटी 107.34 टक्के

चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम हा उच्चांकी ऊस गाळपामुळे आव्हानात्मक असाच होता. मात्र, साखर कारखान्यांनी केलेल्या नियोजनामुळे उच्चांकी ऊस गाळप वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली आहे. काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यात ऊसतोडणीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, तोडणी यंत्राद्वारे ऊसतोडीस प्राधान्य देण्यात आल्यामुळे ऊस गाळप पूर्ण होऊ शकले. शिवाय साखरेचे दर उंच राहणे आणि उपपदार्थ विक्रीतून कारखान्यांना उपलब्ध होत असलेल्या रकमेमुळे शेतकर्‍यांना उसाच्या एफआरपीची रक्कम देण्याचे प्रमाणही चांगले राहिले.

                     – संजय गोंदे, प्रभारी प्रादेशिक, साखर सहसंचालक, पुणे

 

Back to top button