कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा रुईकर कॉलनीसमोरील परप्रांतीय मूर्तीकारांना मारहाण व दमदाटीचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. महिला व पुरुषांचा समावेश असलेला 10 ते 12 जणांचा जमाव अचानक या ठिकाणी आला. त्यांनी 'ही आमची जागा आहे, तुमच्या झोपड्या खाली करा,' असे म्हणत त्यांनी मारहाण केल्याची तक्रार जखमी आनंद राठोड याने शाहूपुरी पोलिसांत दिली. मूळचे गुजरातचे असणारे परप्रांतीय मूर्तिकार रुईकर कॉलनीसमोरील जागेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. याच परिसरात त्यांच्या झोपड्या आहेत. येथेच महापुरुषांच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवून त्यांची विक्री करण्यात येते.
मात्र, काही दिवसांपूर्वी या परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाने पत्र्याचे कंपौंड उभारले आहे. शनिवारी एक जमाव या ठिकाणी आला होता. त्यांनी ही जागा खाली करण्यास सांगितले. यातून गोंधळ उडाला. जमावातील काहींनी काठीने या मूर्तिकारांच्या साहित्याचे नुकसान केल्याचे तसेच मारहाण केल्याची माहिती आनंद राठोड व इतर मूर्तिकारांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक राजेश गवळी, तानाजी सावंत हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला.