निमगाव केतकीतील बँक ग्राहक नेटवर्कअभावी त्रस्त | पुढारी

निमगाव केतकीतील बँक ग्राहक नेटवर्कअभावी त्रस्त

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा: निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील बीएसएनएलचे नेटवर्क नसल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधील कामकाज होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. मुख्य बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने तर चक्क नेटवर्क समस्या असल्याने बँकेचे कामकाज बंद राहील असा फलक लावल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. निमगाव केतकी पंचक्रोशीतील दहा-बारा गावातील ग्रामपंचायती, सोसायट्या, पतसंस्था, शेतकरी, व्यापारी वर्ग यांची खाती मोठ्या संख्येने गावातील या दोन बँकेत आहेत. नेटवर्कअभावी पैसे भरण्याचे व काढण्याचे व्यवहार बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या असल्याने बँकेचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बँकेत कनेक्टिविटी नसल्याने दोन्ही बँकेचे व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. ग्राहक सकाळपासूनच बँकेच्या दारात उभे राहतात. मात्र, दुपारपर्यंत वाट पाहून त्यांना घरी जावे लागते. पेन्शनधारकांनादेखील जाण्यायेण्याचा भुर्दंड सोसावा लागतो. कनेक्टिविटी नसल्यास बँकेने ताबडतोब सर्व ग्राहकांना मोबाईलवर मेसेज देऊन वेळोवेळी सूचित करावे. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारण्याचा त्रास होणार नाही अशी मागणी बँकेच्या काही ग्राहकांनी केली.

याबाबत महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक पंकज श्रीवास्तव व पुणे जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक रमेश साळुंखे म्हणाले की, नेटवर्कमुळे ग्राहकांना सेवा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. सध्या पालखी महामार्गाच्या कामाला गती आली आहे. त्यात बीएसएनएलचे नेटवर्क खंडित होत आहे. ही समस्या दूर करण्याची मागणी आम्ही बीएसएनएलकडे केली आहे.

हेही वाचा

दोन दुचाकीचोर जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

एकनाथ शिंदेंचं बंड योग्यच, पण त्यांनी फडणवीसांसोबत जाऊ नये : बंडू शिंगरे

निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; नागरिकांची यादी पाहण्यासाठी झुंबड

Back to top button