बालभारती ते पौड मार्गाचे लवकरच सर्वेक्षण | पुढारी

बालभारती ते पौड मार्गाचे लवकरच सर्वेक्षण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बहुचर्चित बालभारती ते पौड रोड यादरम्यानच्या नियोजित मार्गासाठी महापालिकेकडून लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण रस्ता, उन्नत रस्ता (उड्डाणपूल) आणि बोगदा, अशा तीन पर्यायांचा विचार करून केले जाणार असल्याची माहिती पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता या तीन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड रोड या मार्गाचे नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गाची चर्चा गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे. या मार्गासाठी चालू अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली.

हा मार्ग हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीच्या भागातून जाणार आहे. या भागात भूजल क्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असल्याने कामासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे या भागातील जैवविविधतेला धोका पोहचेल. अशा विविध कारणांमुळे पर्यावरणप्रेमींकडून त्यास विरोध होत आहे. या मार्गाला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून विरोध असल्याने काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत.

यासंदर्भात महापालिकेने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांच्या बैठकाही घेतल्या आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने या मार्गाच्या उभारणीसंदर्भात तीन पर्यायांचा विचार सुरू केला आहे. यामध्ये प्रत्यक्षात जमिनीवर रस्ता उभारणे तसेच उन्नत रस्ता म्हणजे साधारण तीन मीटर उंचीच्या खांबावर रस्ता तयार करणे, टेकडीला बोगदा पाडून रस्ता तयार करणे अशा तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. या तीनपैकी कोणता मार्ग करता येऊ शकतो, याविषयी महापालिकेकडून लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे.

आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने नियुक्ती पत्र; गुन्हा दाखल करण्याचा आदेश

त्याला विरोध करणार्‍यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते. या भागात अनेक संस्था असून, त्या सरकारी जागेवर आहेत. त्यांना पालिकेने सर्वेक्षणासंदर्भात कळविले आहे. या सर्वेक्षणात मातीचे परीक्षण, भूजलपातळी, किती झाडे तोडावी लागतील, याचा अभ्यास केला जाणार आहे.

आराखड्यात रस्त्याचा समावेश

महापालिकेने काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नियोजन करून प्रत्यक्षात कामास सुरुवात केली होती. परंतु, पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हा न्यायालयाने हा रस्ता विकास आराखड्यात आहे का? असा मुद्दा उपस्थित करून काम थांबविले होते. त्यानंतर शहराचा नवीन विकास आराखडा करताना या रस्त्याचा समावेश करून त्यावर हरकती आणि सूचना मागवून सुनावणी घेतली आहे.

पर्यावरणप्रेमी, नागरिकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय होणार आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेनुसारच आम्ही तीनही पर्यायांचा विचार करीत आहोत. हा रस्ता सरकारी जागेतून होत असल्याने भूसंपादनाचा खर्च नाही. फक्त पौड रोडच्या बाजूला काही घरे बाधित होत आहेत. त्यासंदर्भात प्रशासन विचार करीत आहे.

                        – व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, महापालिका

हेही वाचा

हत्तीमुळे होणार्‍या मालमत्ता नुकसानीचीही भरपाई मिळणार

उड्डाणपुलाच्या आधी रस्त्याचे काँक्रिटीकरण

बेशिस्त वाहनचालकांना वेसण; स्वारगेट चौकात सर्व यंत्रणांची एकत्रित पाहणी

Back to top button