डंपरच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती जखमी; पुणे-सातारा महामार्गावर अपघात | पुढारी

डंपरच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती जखमी; पुणे-सातारा महामार्गावर अपघात

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : सुट्टीसाठी मूळगावी जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला. अपघातानंतर डंपर चालकाने तेथून पलायन केले आहे. पुणे-सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. ९) रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात घडला.

सोनाली महेश साठे (वय २३) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर तिचा पती महेश बाळू साठे (वय २८, रा. दोघेही रा. सध्या रा. गजानननगर, फुरसंगी, ता. हवेली, पुणे. मूळ रा. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी महेश साठे यांनी राजगड पोलिस ठाणे, नसरापूर येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धडक देऊन पसार झालेल्या डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कामाला असणारे महेश आणि सोनाली हे दोघे गुरुवारी सकाळी त्यांचे मूळ गाव बांबवडेला दुचाकी (एमएच १० डीयू ७५५९) वरून जात होते. पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने (एमएच १२ व्हीटी ८६८९) जोरात धडक दिली. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या सोनालीच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर महेश जखमी झाला. दरम्यान, खेड-शिवापूर टोलनाक्याच्या रुग्णवाहिकांमधून दोघांनाही नसरापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सोनालीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी राजगड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button