आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज | पुढारी

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत आंबेगाव विधानसभा 196 ची मतदान यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. प्रशासनाच्या वतीने गृह मतदान घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांत येऊन मतदान करण्यात सक्षम नसलेले दिव्यांग किंवा 85 वर्षांच्या मतदारांसाठी थेट घरातून मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. शिरूर लोकसभेचे 13 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी 2200 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अवसरी शासकीय कॉलेज येथे ईव्हीएम मशिनबद्दल माहिती देऊन मशिन सील करून अवसरी शासकीय स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, तेथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 182 गावे आहेत. एकूण केंद्र 340, एकूण मतदार 3 लाख 2 हजार 101 असून, लोकसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी उष्माघात होऊ नये म्हणून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 85 वर्षे वयापेक्षा अधिकचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती अशा 175 नावांची यादी अंतिम झालेली आहे.

या 175 व्यक्ती 63 गावांतील आहेत. या 63 गावांच्या बीएलओ यांनी दिलेल्या शिफारसीच्या आधारावर ही यादी तयार झालेली आहे. दि. 7, 8 व 9 मे रोजी हे गृह मतदान करून घेतले जात आहे. त्यासाठी एकूण 7 पथके निश्चित केलेली आहेत. या मतदानाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. तसेच कर्तव्यावर असलेल्या 189 अधिकारी, कर्मचारी यांचे टपाली मतदान दि. 8, 9 व 10 मे रोजी सुरू झाले आहे. असे तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button