राजगडाच्या तीन माच्या, धडकी भरविणारा बालेकिल्ला | पुढारी

राजगडाच्या तीन माच्या, धडकी भरविणारा बालेकिल्ला

राजेंद्र खोमणे

नानगाव : राजगडाला तीन माच्या, तर एक मोठा बालेकिल्ला आहे. त्याप्रमाणे पद्मावती माचीवर पोहोचल्यावर पद्मावती तलाव, सईबाई समाधी, पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर, पाण्याच्या टाक्या, राजवाडा, धान्यकोठार, दारूगोळा कोठार, राजसदर, तटबंदी अशा अनेक गोष्टी पाहण्यासाठी आहेत. शिवकालीन पद्मावती मंदिरात प्रत्येक धार्मिक कार्यक्रम केले जातात. कचेरी जवळ व पद्मावती मंदिर व रामेश्वर मंदिराच्या मधोमध तर पद्मावती तलावाकडून माचीवर येताना सईबाई यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन पुढे जाता येते.

याच परिसरात पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत. बारा महिन्यांपैकी मार्च, एप्रिल, मे या महिन्यात पाण्याची टाकी कोरडीठाक पडतात. त्यामुळे या काळात गडावर जाणार्‍यांना पाण्याची व्यवस्था करूनच जावे लागते. गडाच्या सुवेळा माचीचे अंतरदेखील मोठे आहे. या माचीवर जाताना प्रथम भग्न अवस्थेमधील दरवाजा आढळून येतो, या दरवाजातून प्रवेश करून बालेकिल्ल्याच्या पायथ्यावरून आपण हनुमान टेकडीकडे पोहोचतो, तर नंतर चिलखती बुरुजाकडे जातो.

चिलखती बुरुज व समोरच आकाशात भिडणारी दुहेरी तटबंदीची सुवेळा माची शिवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. एकसंध कातळावर हा चिलखती बुरुज उभा करण्यात आला आहे. सुवेळा माचीवरून बुरुंजाकडे पाहिले, तर त्याची भव्यता लक्षात येते. सुवेळा माचीवरदेखील पाण्याची टाकी आहे. गडापर्यंत पोहोचणारे मार्ग अवघड करून शत्रूपासून गड सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले डोंगर धारेवरील ब़ांधकामाला माची म्हणतात.

म्हणे, राजेंविरोधात तिसरा पर्याय देणार ! आ. शशिकांत शिंदेंनी बैठक घेतल्याची चर्चा

राजगडचा बालेकिल्ल्याची उंची ही छातीमध्ये धडकी भरवणारी आहे. काळाकुट्ट सरसोट पाषाणावर राजगडचा बालेकिल्ला आजही छाती पुढे काढत उभा आहे. उंच आणि कड्याकपारीची वाट वर चढत आपण महादरवाज्यात पोहोचतो. बालेकिल्ल्याचा महादरवाजा आजही तसाच निधड्या व रांगड्या छातीसारखा उभा आहे. बालेकिल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातूनदेखील पर्यटक येत असतात. महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर शिवकालीन जननी मातेचे मंदिर दिसते, पुढे तटबंदीच्या पायर्‍यावरून वर चढत गेल्यावर समोर चंद्रकोर तलाव दिसतो. चंद्राच्या आकाराचे तलाव असल्याने त्याला चंद्रकोर तलाव म्हणतात.

तसेच, याच परिसरात बाजरपेठ, महादेव मंदिर, टेहाळणी बुरुंज आहे. आपण असेच थोडे उंचावर गेल्यावर बालेकिल्ल्याचा भाग सुरू होतो. या ठिकाणी सदर, राजवाडा व असे अनेक बांधकामे आहेत. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यावर गडाच्या पद्मावती, सुवेळा व संजीवनी माची दिसतातच, मात्र जर आपण उन्हाळ्यात बालेकिल्ल्यावर असाल, तर तुम्हाला तोरणा, सिंहगड, रोहिडा (विचित्रगड) पुरंदर, लिंगाणा, रायगड, कमळगड आणि रायरेश्वराचे पठार दिसते.

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि कायमची राजधानी रायगड हा 125 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक शिवप्रेमीला पर्वणीच ठरेल असा आहे. सह्याद्रीचे डोंगर, दर्‍या, जंगल, पाऊलवाट तुडवत होणारा हा प्रवास स्वर्गसुखाचा आनंद देणारा नयनरम्य असा आहे. या प्रवासातील चित्तथरारक प्रसंग, इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणार्‍या वास्तू,नैसर्गिक वैशिष्ट्ये या संबंधीची मालिका…

हेही वाचा

कोल्हापूर महापालिका : 23 जूनला होणार मतदार यादी प्रसिद्ध

सांगलीत टेम्पोचे टायर पळविले

मतदार याद्या होणार 23 जूनला प्रसिद्ध

Back to top button