म्हणे, राजेंविरोधात तिसरा पर्याय देणार! आ. शशिकांत शिंदेंनी बैठक घेतल्याची चर्चा

Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देऊन दोन्ही राजेंच्या विरोधात शहर महाविकास आघाडी निर्माण करण्यावर आ. शशिकांत शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत एकमत झाले म्हणे! याबाबतची बैठक नेमकी कुठे झाली? कधी झाली, याचा उलगडा रात्री वर्तमानपत्र छापायला गेल्यानंतर पाठवलेल्या प्रेसनोटमध्ये झालेला नाही. दरम्यान, सातारा पालिका निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे काय करतात, हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल टाकण्याबाबत आघाडीतील घटकांशी चर्चा करून चार दिवसांत अधिकृत घोषणा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी जाहीर केले.

सातारा पालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग आरक्षण सोडत झाली. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आ. शशिकांत शिंदे यांनी सातार्‍यातील काही मोजक्या लोकांची बैठक घेऊन महाविकास आघाडी तिसरा पर्याय देणार असल्याचे सांगितल्याचे बुधवारी रात्री उशिरा पाठवून देण्यात आलेल्या एका प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.

या बैठकीत सातारा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर सातारा शहर महाविकास आघाडी निर्माण करण्यावर उपस्थितांनी सहमती दर्शवली. त्यानुसार आगामी काळात पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देण्याचा संकल्प करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर या महाविकास आघाडीची घोषणा झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, अस्लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, अमर गायकवाड, गिरीश मोडकर, स्नेहा अंजलकर, सलीम कच्छी, अमित कदम, अमृता पाटील, रावण गायकवाड, मोहनीस शेख, राहूल यादव, नंदकुमार कवारे आदि उपस्थित असल्याचे संबंधीत प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.

मात्र, ही बैठक कधी झाली? कुठे झाली? याचा थांगपत्‍ता प्रेसनोटमध्ये नाही त्याचे छायाचित्रही नाही. त्यामुळे रात्री उशीरा वर्तमानपत्रे छापायला गेल्यानंतर पाठवून देण्यात आलेल्या प्रेसनोटमागचे गमक उलगडायला वाव नाही. कथित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे नेते दीपक पवार अनुपस्थित होते.

याबाबत दीपक पवार यांना विचारले असता ते म्हणाले, सातारा शहराच्या राजकारणात अनेक वर्षांपासून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात संघर्ष होत आहे. या दोन्ही राजेंच्या आघाड्यांच्या पारंपरिक सत्तासंघर्षाला भेदण्याचा प्रयत्न केला जातो पण त्याला फारसे यश येत नाही. त्यामुळे या दोन्ही राजांच्या विरोधात आगामी नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच अपक्ष व नाराज गट यांच्या संपर्कात आहे. त्यानुसार हे सर्व अंदाज घेवून येत्या चार दिवसांत महाविकास आघाडीचा सक्षम पर्याय देणार असल्याने त्यांनी सांगितले.

दीपक पवार म्हणाले, 2014 साली झालेल्या सातारा-जावली विधानसभा निवडणुकीस भाजपमधून सामोरे गेलो होतो. तर त्यानंतर 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार सातारा- जावली विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्याचबरोबर सलग तीन पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. या विधानसभा मतदारसंघातील सातारा शहरात आपलाच सर्वाधिक संपर्क राहिला आहे. त्याबाबत विधानसभेच्या निवडणुकीलाही बोलके चित्र सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे या शहरातील नाराज गट असो की, अपक्ष त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनीशी पालिकेत पॅनेलच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिपक पवार म्हणाले, सातारा पालिका निवडणुकीबाबत सर्व स्तरातील घटकांबरोबर माझी चर्चा सुरु आहे. नाराज अपक्षांसोबत चर्चा करुन एकसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन राजांविरुध्द पॅनेल असणार आहे. सध्या आ. शशिकांत शिंदे काय करणार आहेत, त्याला माझ्यादृष्टीने फारसे महत्व नाही. त्यांची आजची भूमिका कायम राहणार की नाही हे त्यांचे त्यांनाच माहित, असे पवार यांनी सांगितले. दिपक पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सातारा पालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तरी उभी फूट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, आ. शशिकांत शिंदे यांची बैठक कुठे झाली? या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी अनभिज्ञ कसे काय? ही बैठक खरंच झाली की प्रेसनोटवरच झाली, अशीही उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

शिंदेच्या नुसत्याच बैठका असतात : पवार

सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे यांनी आजपर्यंत चार-पाच बैठका घेतल्या आहेत. पण, त्यात ठोस कृतीयुक्‍त काहीच नसते. त्यामुळे पालिका निवडणुकीबाबत त्यांचा सोयीनुसार कार्यक्रम असतो की कसा, हे त्यांनाच माहित. पण मी येत्या चार दिवसांत सर्वांना बरोबर घेवून बैठक घेणार आहे. या बैठकीला शशिकांत शिंदे असणार का? याबाबत विचारले असता दीपक पवार म्हणाले, माझ्या बैठकीबाबतचे नियोजन चार दिवसांनंतरचे हे जाहीर आहे, त्याला त्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news