कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार आता 23 जून रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 1 जुलैपर्यंत त्यावर हरकतींची मुदत असेल. 9 जुलै रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध होणार आहेत. सुमारे साडेचार लाखांवर मतदार आहेत.
दरम्यान, जुन्या कार्यक्रमानुसार 17 जूनपर्यंत मतदारयाद्या प्रसिद्ध करायच्या होत्या. परंतु, महापालिकेकडून अद्याप मतदारयाद्यांचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, प्रशासनाने मतदारयाद्यांसाठी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाने मुदतवाढ दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर धामधूम सुरू झाली आहे. पहिल्यांदाच त्रिसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यानुसार 92 नगरसेवकांसाठी 31 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येकी तीन नगरसेवकांचे 30 प्रभाग आणि दोन नगरसेवकांचा 1 असे प्रभाग असणार आहेत.
निवडणुकीसाठी 31 मे रोजी आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. त्यानंतर मतदारयाद्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्यांची मतदारयाद्यांचे काम करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
एकेका प्रभागात सुमारे 15 ते 17 हजार मतदार असणार आहेत. परिणामी, इच्छुकांचे लक्ष मतदारयाद्यांकडे लागले आहे. अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच खर्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे. इच्छुकांना पहिल्यांदाच ए?वढ्या मोठ्या प्रभागाला सामोरे जावे लागत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. निवडून येण्यासाठी आतापासूनच मतदारांना सांभाळण्यासाठी इच्छुकांची धावपळ उडणार आहे.