विधी प्रवेशासाठी चुरस वाढणार ! | पुढारी

विधी प्रवेशासाठी चुरस वाढणार !

गणेश खळदकर

पुणे : सरकारी कामकाजापुरत्या मर्यादित असलेल्या विधी क्षेत्रात आता अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, कायद्याचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यंदा 17 हजारांच्या आसपास जागा असलेल्या तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी तब्बल 85 हजार विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी अर्ज केला आहे.

त्यामुळे जीवघेणी स्पर्धा होणार असून, प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे दिसते आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आता कायद्याचा अभ्यास केलेली व्यक्ती गरजेची असते. त्यामुळे विधी क्षेत्राचा विस्तार वाढत असून, विद्यार्थ्यांची मागणीही दिवसागणिक वाढत आहे. बहुतांश विद्यार्थी कायद्याचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने जोड शिक्षण म्हणूनही विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. शिवाय या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाल्यामुळे विधी अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांपासून प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे.

पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे (पदवीनंतर), तसेच पाच वर्षे (बारावी नंतर) अशा दोन स्वरूपांत घेतला जातो. आत्तापर्यंत तब्बल 84 हजार 768 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. 22 जूनपर्यंत सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आपलं नाणं खणखणीत असेल तर मग कशाला घाबरायचं? : शरद पवार

‘विधी’च्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधीच संधी

सिव्हील, क्रिमिनल, कामगार, कंपनीविषयक कायदे, करविषयक प्रकरणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार, ग्राहक हक्क संबंधांवर कायदे, को-ऑप. सोसायटी, ट्रस्ट कायदे, वन व पर्यावरणविषयक कायदे, कौटुंबिक कायदे, मेडिको लीगल कायदे, परिवहन अपघात ट्रिब्युनल्स, पेटंट्स मिळवून देणारे व हक्क अबाधित राखणारे अशी अनेक क्षेत्रे कायदा पदवीधरांना खुणावत आहेत.
डिपार्टमेंट ऑफ आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलिस सेवा, सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ता, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ, क्रिमिनोलॉजिस्ट, कायद्यासंबंधित लिखाण करणारा लेखक, बँकर, पेटंट अ‍ॅटर्नी, सायबर आदी क्षेत्रांतही वकील अथवा सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे.

  • एका जागेसाठी पाच उमेदवार प्रवेशाच्या रांगेत
  • 17 हजार जागांसाठी 85 हजारांच्या आसपास अर्ज
  • अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरीच्या अनेक संधीमुळे मागणी वाढली

गेल्यावर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी

  • विधी तीन वर्षे प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी – 68 हजार 875
  • विधी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी प्रवेश – 17 हजार 350

स्पर्धा परीक्षा : सामाजिक बदलांचं सुचिन्ह

विधी अभ्यासक्रम आता मल्टिडिसीप्लिनरी अभ्यासक्रम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी पर्याय म्हणून नाही, तर थेट करिअरसाठी जाणीवपूर्वक या अभ्यासक्रमाची निवड करत आहेत. यंदा जागांपेक्षा अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास मेरीट वाढणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुण जास्त त्यांचाच प्रवेश होईल. त्याचबरोबर अर्ज केलेले सर्वच विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करणार असल्यामुळे महाविद्यालयांवर प्रवेशाचा ताण येणार आहे.

                                 – डॉ. क्रांती देशमुख, प्राचार्या, शंकरराव चव्हाण विधी

हेही वाचा 

राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांचा पक्ष कोणता?

सेवा करायची नसेल तर घरी बसा, राजकारणात येऊ नका : नाना पाटेकर

उर्फी जावेद हिने परीधान केला पोत्यांचा बनलेला ड्रेस

Back to top button