राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांचा पक्ष कोणता?

राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांचा पक्ष कोणता?
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा ; राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळे सहावी जागा जिंकण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

संजय राऊत यांनी 'अपक्षांचा घोडेबाजार' असा शब्द वापरल्याने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार संतप्त झाले आहेत. शिवसेनेचे संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदन म्हणून सही करणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे शिवसेनेवर नाराज आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्षांचा घोडेबाजार सुरू आहे, अशी टीका केली होती. यावर आम्ही पक्षाचा आधार नसताना निवडून आलो आहोत. घोडेबाजार म्हणून आमच्यावर टीका केली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.

सहा जागांसाठी सातवा उमेदवार रिंगणात आल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत कमालीची रंगत आली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांना तीन दिवस मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या आमदारांची बैठक 6 जूनला बोलवली आहे.

काँग्रेसकडे 44 मते असून ते ही सर्व मते काँग्रेसच्या उमेदवाराला देण्याचे पक्षाने ठरविले आहे. तर राष्ट्रवादीने आपल्या 44 मतांचा कोटा प्रफुल्ल पटेल यांना देण्याची रणनीती आखली आहे. पहिल्या फेरीत ते निवडून आले पाहिजेत, याची खबरदारी राष्ट्रवादी घेत आहे. त्यामुळे त्यांची केवळ 9 मते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळतील. शिवसेनेने राऊत यांना 42 मतांचा कोटा देण्याचे ठरले असून शिवसेनेकडे दुसर्‍या उमेदवारासाठी 13 मते उरतात. त्यामुळे शिवसेनेची 13, राष्ट्रवादीची 8, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची 2, सीपीएम 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 अशी 32 मते शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराला मिळतील, असा दावा शिवसेनेच्या सूत्रांनी केला. म्हणजे शिवसेनेला आणखी 10 मतांची बेगमी करावी लागेल.

मात्र सरकारला पाठिंबा देणारे बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, स्वाभिमानी 1, शेकाप यांनी सरकारबद्दल नाराजीचा सूर काढला आहे. त्यामुळे आघाडीच्या गोटात अस्वस्थता आहे. दुसरीकडे भाजपच्या तिसर्‍या उमेदवारासाठी स्वत:ची 22 मते, अपक्ष 6, जनसुराज्य 1, मनसे 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1 अशी एकूण 31 मते हक्काची आहेत. भाजपलाही जिंकण्यासाठी आणखी 11 मते लागतील. बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, एमआयएम 2 ही सात मते सहाव्या उमेदवाराला जिंकण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. या तिन्ही पक्षांच्या भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

हितेंद्र ठाकूर नाराज; सपाचे लखनौकडे बोट तर एमआयएमचा सेना, भाजपला विरोध

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारवर उघड नाराजी व्यक्त करीत बहुजन विकास आघाडीचे नेते आ. हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. मात्र, त्यांनी भाजपलाही पाठिंबा दिलेला नाही. दुसरीकडे शिवसेना आणि भाजप हे एकसारखेच आहेत, असे सांगत समाजवादी पार्टीचा निर्णय लखनौमध्ये होईल, असे संकेत सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी दिले. एमआयएमने तूर्त शिवसेना व भाजप दोघांनाही विरोध केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांची मते सहाव्या जागेसाठी निर्णायक ठरणार आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारला पाठिंबा देऊनही त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची कामे केली नाहीत, यामुळे ठाकूर हे आघाडीवर नाराज असल्याचे कळते.

आम्हाला कोणत्याही पक्षाची अलर्जी नाही. मला कोणी अस्पृश्य नाही. त्यामुळे जे आमच्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवतील, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. केंद्र आणि राज्य सरकारकडे आमच्या जिल्ह्यातले प्रश्न आहेत, असे सांगून बविआचे नेते आ. हितेंद्र ठाकूर म्हणाले की, मी याआधी सर्वच पक्षांना मते दिली आहेत. त्यामुळे पक्ष महत्वाचा नाही. ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. आम्ही ठाकूर यांची नाराजी दूर करू, असे त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार धनंजय महाडीक यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेवून, पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र त्यांना हितेंद्र ठाकूरांनी कोणताही शब्द दिलेला नाही.

शिवसेना भाजप सारखेच : आझमी

समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. पण शिवसेना आणि भाजप हे दोघे सारखेच आहेत. पण अल्पसंख्याक समाजासाठी आघाडी सरकारने काहीच केले नाही त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे ठरवतील, असे समाजवादी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष अबु आझमी यांनी सांगितले.

एमआयएमचे दोन आमदार आहेत. आमचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही, असे एम आय एम चे खासदार जलील यांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news