दोन कोटी सोन्याची तस्करी करणाऱ्या संशयिताने नागपुरात संपविले जीवन

file photo
file photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन कोटी रुपयांच्या सोने तस्करी प्रकरणी सांगलीतील एकाला अटक करण्यात आली होती. या संशयित आरोपीने मंगळवारी (दि.१८) नागपुरातील सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) सहाव्या माळ्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी बरीच गोपनीयता पाळली गेली असून डीआरआयच्या कस्टडीत असताना झालेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून सोने तस्करांमध्ये दहशत पसरली आहे. दीपक मच्छिंद्र देसाई (२८, रा. तासगाव, जि. सांगली) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दीपक आणि त्याचा साथीदार बोडखे हे दुरांतो एक्स्प्रेसने कोलकात्याहून मुंबईला जात होते. त्यांच्याकडे तीन किलो सोने होते. ज्याची किंमत २ कोटी १० लाख रुपये आहे. हे सोने त्याला मुंबईच्या झवेरी बाजारातील व्यावसायिकाला द्यायचे होते. डीआरआयला याची कुणकुण लागली व ही कारवाई करण्यात आली. पथकाने त्या तस्करांचा पाठलाग केला. शुक्रवार (दि.१४) पहाटे दुरांतो एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर आली तेव्हा डीआरआयच्या पथकाने दीपक देसाई आणि बोडखे यांना पकडले. त्यांच्याकडून सोन्याचे रॉड जप्त करण्यात आले.

याप्रकरणी कोलकाता आणि मुंबईतील सराफा व्यापाऱ्यांकडेही चौकशी करण्यात आली. शनिवारी दुपारी ४.३० वाजता डीआरआय उपसंचालकांच्या दालनात दीपक देसाई आणि त्याच्या साथीदाराची चौकशी सुरू असताना दीपक देसाई याने गुंगारा देत सहाव्या माळ्यावरील केबिनच्या खिडकीतून उडी मारली. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एखाद्या आरोपीने डीआरआयच्या कोठडीत असताना आत्महत्या केल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news