जालना : ओबीसी आंदोलनाची दखल न घेतल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको

जालना : ओबीसी आंदोलनाची दखल न घेतल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको

वडीगोद्री , पुढारी वृत्तसेवा : वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज (दि.१८) सहावा दिवस आहे. दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत आज सायंकाळीच्या सुमारास आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे सुमारे अर्धा तास रस्ता रोको केला. यावेळी आक्रमक ओबीसी कार्यकर्त्यांकडून महामार्गावर टायर पेटवून जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाचप्रकारे सुरू राहील, असा इशारा देण्यात आला. यावेळी शांततेत आंदोलन करा, अशी विनंती लक्ष्मण हाके यांनी केल्यानंतर ओबीसी कार्यकर्त्यांकडून रस्ता मोकळा करण्यात आला.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असूनही शासनाकडून कुणीही लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी आले नाही. व शासनानेही उपोषणाकडे कानाडोळा केला, असा आरोप करत ओबीसी संघटना आज आक्रमक झाल्या. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे रस्ता रोको आंदोलन करत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्यानंतर आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर टायर पेटवत जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाचप्रकारे सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. अचानक रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. यावेळी दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावत परस्थिती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तब्बल अर्धा तासाने रस्ता रोको मागे घेण्यात आला.

पोलिसांकडून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न

घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी काळजी घेतली गेली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश खांडेकर आंदोलन स्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

मागील सहा दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके आणि वाघमारे सर यांचे उपोषण सुरु आहे. पण शासनाकडून कोणत्याही प्रकारची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. त्यांची प्रकृती आज खालावली आहे, तरीही शासन लक्ष देत नाही. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन रस्ता रोको केलेला आहे
-एक आंदोलक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news