रामदास आखाडे यांच्या मारेकर्‍यांवर ‘मोक्का’ कारवाई | पुढारी

रामदास आखाडे यांच्या मारेकर्‍यांवर ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन येथील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांच्या मारेकर्‍यांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा ( ‘मोक्का’) अंतर्गत कारवाई केली आहे.

बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल खेडेकर (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय 21, तिघेही रा. उरुळी कांचन, ता. हवेली), अक्षय दाभाडे (वय 27, रा. सोरतापवाडी), करण विजय खडसे (रा. सहजपूर, ता. दौंड), प्रथमेश कोलते (वय 23, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), गणेश मधुकर माने (वय 20 रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली), निखिल चौधरी (वय 20, रा. कोरेगाव मूळ), निलेश आरते (वय. 23, हडपसर, पुणे), काजल कोकणे (वय 19 रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) अशी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि.18) जुलै रात्री उरुळीकांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे (रा. जावजीबुवाची वाडी, ता. दौंड) यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. दोन अनोळखी इसमांनी आखाडे यांच्यावर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले होते. आखाडे यांचा उपचारादरम्यान (दि.21) जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

व्यावसायिक वर्चस्ववादातून हत्या

तपासादरम्यान हा गुन्हा बाळासाहेब खेडेकर यांनी त्यांच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने ही हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. व्यवसायातील स्पर्धेतून त्यांचा भाचा सौरभ ऊर्फ चिम्या व इतरांना दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे सांगून रामदास आखाडे हत्याकांड घडवून आणले.

या गुन्ह्याचा छडा लावत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या पथकाने दहाजणांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहात आहेत. तसेच एक विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते.

‘या’साठी मोक्का लावला

हे सर्वजण टोळी वर्चस्वासाठी संघटित गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी निलेश आरते हा हडपसर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, जबरी चोरी, हत्यार व अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे विविध प्रकारचे २१ गुन्हे हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदयान्वये (मोक्का) कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का कलम वाढ करण्यास मान्यता दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केली.

आयुक्तांची ४२ वी कारवाई

पोलिस अधीक्षक अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सराईत गुन्हेगार व टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आत्तापर्यंत 42 मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आहेत. पोलिस आयुक्तांच्या धडक मोहिमेचा धसका घेत अनेक सराईतांनी शहराबाहेर पळ काढला आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : २०० वर्ष जुने बंगले असणारे मुंबईतील म्हातारपाखाडी

Back to top button