मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'प्रकल्प कुठलाही असो पाहुणा मुंबईचाच लागतो' | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'प्रकल्प कुठलाही असो पाहुणा मुंबईचाच लागतो'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन चांगलीच टोलेबाजी रंगली. हे दोन्ही वरिष्ठ मंत्री नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अकादमीच्या इतिहासाचा दाखला देताना ‘११५ वर्षांपूर्वी ही अकादमी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे येथून नाशिकला आणली होती. पुण्यातील प्रकल्प इतर ठिकाणी नेणे अवघड असतेच.’ अशी कोपरखळी मारली होती. यावर ‘प्रकल्प कुठलाही असू द्या मात्र उद्घाटनाला पाहूणा मुंबईचाच लागतो.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हाशा पिकला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘राज्याचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी पोलिस सदैव कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांना ताकद, सुविधा देणे आवश्यक आहे. पोलिसांनी केलेल्या मागण्या नसून त्या आवश्यकता आहे. या आवश्यकता आम्ही पूर्ण करू.’ असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील पोलिसांचे मानांकन देशात अव्वल असून त्याचा अभिमान आहे. राज्यात पोलिसांनी ताकद आणि जीद्द जोपासणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या निवाऱ्यासह इतर गरजा, आवश्यकता पूर्ण करणे गरजेचे आहे.’

उद्धव ठाकरेंनी ‘अकादमीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांमधून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिकंणारा खेळाडू निर्माण झाला पाहिजे.’ अशीही अपेक्षा व्यक्त केली. पोलिसांच्या प्रशिक्षणात संघभावना, एकाग्रता आवश्यक असून त्यांना दिशा दाखवणे महत्वाचे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : आईचे तुकडे करणारा कसा पोहोचला फाशीच्या शिक्षेपर्यंत?

Back to top button