पिंपरी : महापारेषण कंपनीच्या भोसरी केंद्रात मोठा बिघाड, ६० हजार ग्राहक अंधारात | पुढारी

पिंपरी : महापारेषण कंपनीच्या भोसरी केंद्रात मोठा बिघाड, ६० हजार ग्राहक अंधारात

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये (दि.२३) रोजी सकाळी सहाच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.

विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु असून त्याबाबत दुपारपर्यंत स्थिती स्पष्ट होणार आहे. अशी माहिती मिळाली.

भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेचे दोन व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो.

पिंपरी चिंचवड : पहाटेपासून काही भाग अंधारात

मात्र यातील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये पहाटे बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील ४५०० औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.

महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. १०० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरपैकी एकच सुरू आहे. व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर सुरू होते. मात्र आज सकाळी १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये पहाटे बिघाड झाला. त्यामुळे सर्व यंत्रणा कोसळली आहे.

Back to top button