Sri Lankan economic crisis : श्रीलंकेत महागाईचा भडका! नागरिकांचे भारतात पलायन, १६ जण ताब्यात | पुढारी

Sri Lankan economic crisis : श्रीलंकेत महागाईचा भडका! नागरिकांचे भारतात पलायन, १६ जण ताब्यात

चेन्नई; पुढारी ऑनलाईन

Sri Lankan economic crisis : श्रीलंकेची अर्थव्यवस्था प्रचंड आर्थिक संकटात आहे. अन्नधान्यासह दूध आदी जीवनाश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात. पेट्रोल-डिझेल मिळवण्यासाठी लोकांच्या २ किलोमीटर रांगा लागत आहेत. श्रीलंकेत महागाईने जगणे मुश्किल झाल्याने तेथील तामिळ कुटुंबे आता भारतात पलायन करु लागली आहेत. जलमार्गाने अवैधरित्या भारतात आलेल्या १६ श्रीलंकन नागरिकांची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली.

दक्षिण तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि धनुषकोडी जेटी (Dhanushkodi jetty) येथून ताब्यात घेऊन सुटका करण्यात आलेल्या श्रीलंकन नागरिकांमध्ये ८ मुलांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी सहा श्रीलंकेतून आलेले ६ नागरिक सापडले होते. तर अन्य १० जणांचा गट बोटीद्वारे संध्याकाळी दाखल झाला होता. आर्थिक संकटामुळे (Sri Lankan economic crisis) श्रीलंकेतील आणखी काही कुटुंबे भारतात पलायन करण्याची शक्यता असल्याचे भाकित श्रीलंकेतील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला नागरी युद्धामुळे श्रीलंकेतील तामिळ निर्वासितांचा ओघ भारतात वाढला होता. आता सुमारे ६० हजार निर्वासित तामिळनाडूमधील १०७ छावण्यांमध्ये राहत आहेत. या छावण्यांबाहेर सुमारे ३० हजार लोक वास्तव्यास आहेत.

नोकरी नाही. अन्नधान्ये आणि दूध तिपटीने महागले आहे. पेट्रोल-डिझेलसाठी २ किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. पाणी मिळवण्यातच संपूर्ण दिवस जातो. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाही. यामुळे जेवण शिजविणे कठीण झाले आहे, असे श्रीलंकेतून भारतात आलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे.

बोटमनला ५० हजार रुपये दिल्यानंतर श्रीलंकेतील नागरिकांना मध्यरात्री दक्षिण तामिळनाडूतील किनाऱ्यावर आणून सोडण्यात आले होते. पण त्यांना सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईस

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन हा महत्त्वाचा घटक आहे. दरवर्षी श्रीलंकेला पर्यटन व्यवसायातून सुमारे ५ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ३७ हजार कोटींचे परकीय चलन मिळते. श्रीलंकेतील सुमारे ५ लाख लोक हे केवळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. परंतु, कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. देशादेशांमधील विमान वाहतूक खंडित झाली होती. कोट्यवधी लोक घराबाहेर पडले नव्हते. साहजिकच, यामुळे श्रीलंकेला याचा प्रचंड मोठा फटका बसला आणि लंकेच्या आर्थिक विकासाचे पूर्ण गणितच कोलमडून गेले. दुसर्‍या पातळीवर पाहता, श्रीलंका गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या देशांकडून, विशेषतः चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत गेला. कालौघात ही कर्जाची रक्‍कम भरमसाट वाढत गेली आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईस आली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button