IPL मधून बाहेर पडल्याची ‘Jason Roy’ला मिळाली शिक्षा? इंग्लंड बोर्डाकडून बंदीची कारवाई | पुढारी

IPL मधून बाहेर पडल्याची ‘Jason Roy’ला मिळाली शिक्षा? इंग्लंड बोर्डाकडून बंदीची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉयवर (Jason Roy) दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) रॉयवर त्याच्या वाईट वर्तनासाठी ही कडक कारवाई केली आहे. याशिवाय बोर्डाने त्याला २५०० युरो (सुमारे दोन लाख रुपये) दंडही ठोठावला आहे. तसेच ईसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार रॉय याच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याला एका वर्षाच्या निलंबनाला सामोरे जावे लागू शकते.

ईसीबीच्या निवेदनानुसार रॉय (Jason Roy) याच्या वाईट वर्तनामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आणि दंड ठोठावण्यात आला आहे. जर रॉयने आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्याच्यावर ही १२ महिन्यांपर्यंत निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. बोर्डाच्या क्रिकेट शिस्तपालन समितीनेच्या (CDC) रॉयच्या विरोधात आपला निर्णय दिला असून रॉयने त्याच्यावरील आरोप मान्य केले आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, रॉयने ईसीबीच्या ३.३ नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याने असे वर्तन करायला नको होते. कारण त्यामुळे बदनामी होते.’

३१ वर्षीय जेसन रॉयने (Jason Roy) आयपीएल २०२२ मधून माघार घेतली होती. तर लीगची नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सने त्याला लिलावात दोन कोटी रुपयांना विकत घेतले. बायो बबलचा हवाला देत रॉयने आयपीएल २०२२ मधून माघार घेतली. त्याच्यासोबत ही काही पहिलीच वेळ नव्हती, याआधी आयपीएल २०२० मध्येही दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतल्यानंतर त्याने माघार घेतली होती. पण त्यावेळीही त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

रॉयने आयपीएल २०२२ मधून माघार घेतल्यानंतर गुजरात टायटन्सने रहमानउल्ला गुरबाजचा संघात समावेश केला आहे. दरम्यान, रॉयच्या काऊंटी संघ सरेने जाहीर केले की तो चॅम्पियनशिप हंगामातील सुरुवातीचे टप्पे चुकवणार आहे आणि खेळातून लहान आणि अनिश्चित काळासाठी ब्रेक घेणार आहे. रॉय सध्या आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टीची मजा घेत आहे.

Back to top button