पालघर : मासेमारीच्या सोनेरी हंगामाला फटका | पुढारी

पालघर : मासेमारीच्या सोनेरी हंगामाला फटका

पालघर : बाबासाहेब गुंजाळ मुसळधार पाऊस व खवळलेला समुद्र यामुळे कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याला लाभलेल्या 120 किमी लांबीच्या किनारपट्टीवर सध्या मच्छीमार बांधवांनी पुन्हा नौका माघारी आणल्या आहेत.

सुरुवातीला 15 एप्रिलला हवामान खराब व मासळी मिळत नसल्याने आपल्या बोटी किनार्‍यावर ओढल्यानंतर 3 महिने पावसामुळे मासेमारी बंद होती.1 ऑगस्टला समुद्राचे वातावरण चांगले असल्याने शासनाने मासेमारीची परवानगी दिली. त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पावसाळ्यानंतरचा पहिला हंगाम सोनेरी समजला जातो कारण 3 महिने मासेमारी बंद असल्याने समुद्रात मोठ्या प्रमाणात मासळी तयार होते.ती पहिल्या हंगामात प्रत्यक बोटीला वर्षभर पुरेल असे उत्पन्न देऊन जाते. मात्र या वादळाने मच्छीमार बांधवांसमोर संकट उभे ठाकले आहे.

पावसाळ्यानंतरच्या पहिल्या मासेमारी हंगामासाठी कोळी बांधव तयारीला लागतो. नौकेला लागणारे डिझेल, 15 दिवस पुरेल एवढे धान्य,तेल,व्यापार्‍याकडून व्याजी पैसे घेऊन भरतो.परंतु ह्यावर्षी 1 तारखेला मच्छिमार समुद्रात गेला 2 दिवस मासळी मारली आणि अरबी समुद्रात कमीदाबाचापट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ असल्याचे सांगण्यात आले.2 दिवसांच्या कामानंतर मच्छीमारांना तातडीने आपल्या नौका किनार्‍यावर आणाव्या लागल्या. यामुळेच सोनेरी हंगाम संपल्यातच जमा असल्याने मच्छीमार पुन्हा संकटात सापडला असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहे.

वादळांच्या वाढत्या संख्येमुळे पश्चिम किनार्‍यावरही मत्स्य हंगामाचा काही कालावधी वाया जातो आहे. कष्टकरी पारंपरिक मच्छीमार अशा विविध संकटात सापडला असताना शासन नावाच्या व्यवस्थेची म्हणावी तशी साथ त्यांना मिळत नाहीये याची खंत वाटते.रापण, गिलनेट आणि वावळ (गळ पद्धतीची मासेमारी) आदीसह विविध प्रकारांमधील पारंपरिक मासेमारी करणार्‍या सागरी मच्छीमारांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. परंतु त्यांच्या मागण्या आणि प्रश्नांकडे शासनाकडून नीट लक्ष दिले जाते असे सद्यस्थितीवरून दिसत नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे 2 लाख पारंपरिक मच्छीमारांना सध्या मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागतेय.

समुद्रातील खराब वातावरण वादळ असल्याने मुरुड तालुक्यातील व खोल समुद्रात मासेमारी करत असणारे सर्व मच्छीमार नौका पालघर, डहाणू, वसई किनारी विसावल्या आहेत. वादळी वारा सोसाट्याचा असल्याने रात्री नौकांवर खलाशांना जागता पहारा द्यावा लागत आहे. मुख्य हंगामाची कमाई गेली आणि रोजचा खर्च वाढला,खाडीत 1 हजारपेक्षा जास्त बोटी उभ्या असल्याने त्यांना लागणारी साधने सुविधा नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत असून मच्छीमार बांधव पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे.

मच्छीमारांसमोर उभे ठाकले संकट

एकेकाळी महाराष्ट्राच्या समुद्रात मुबलक मिळणारी मत्स्य संपदा आणि तिच्यावर उपजीविका करणारे पारंपरिक मच्छीमार गेली 10-12 वर्षे संकटात सापडले आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 2 लाख पारंपरिक मच्छीमारांना सध्या मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. बेकायदा पर्ससीन मासेमारीचा अतिरेक त्यात परत आता एलईडी दिव्यांचा वापर करून केल्या जाणार्‍या बेकायदा पर्ससीन मासेमारीचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून कोट्यवधी रुपयांची मत्स्य संपदा हडप करणार्‍या कर्नाटक आणि गुजरात राज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनीसुद्धा राज्यातील पारंपरिक मच्छीमारांचे जगणे मुश्कील करून सोडले असल्याने पारंपरिक मच्छीमार संकटात आहेत.

हेही वाचा

Back to top button