विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाचा वाद शमला; अजित पवार यांची मध्यस्थी | पुढारी

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाचा वाद शमला; अजित पवार यांची मध्यस्थी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची शिवसेनेने परस्पर नियुक्ती केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेला वाद विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मध्यस्थीमुळे अखेर निवळला आहे. विधान परिषदेत शिवसेनेची संख्या जास्त असल्यामुळे दानवे यांच्या नियुक्तीला आम्ही पाठिंबा देतो. आता वाद घालण्यात काही अर्थ नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही या भूमिकेचे समर्थन केल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील हवा निघून गेली आहे.

शिवसेनेने दानवे यांची नियुक्ती करताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, तसेच पावसाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेरीस गुरुवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेऊन नाराजीवर पडदा टाकला.

Back to top button