75 मिनिटांत 75 राष्ट्रध्वज रेखाटण्याचा विक्रम | पुढारी

75 मिनिटांत 75 राष्ट्रध्वज रेखाटण्याचा विक्रम

सफाळे : पुढारी वृत्तसेवा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारत सरकार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियाना
अंतर्गत पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म.नी. दांडेकर शाळेचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी 75 मिनिटांमध्ये 75 राष्ट्रध्वज तिरंग्याची चित्रे रेखाटण्याचा विक्रम केला आहे.

कलाक्षेत्रातील अशा नवनवीन अभिनव उपक्रमांची नोंद अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना बहुमानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ज्ञानेश्वर माळी हे पालघर जिल्ह्यात कृतिशील कलाशिक्षक म्हणून ओळखले जातात. कोरोना महामारीच्या टाळेबंदीच्या काळात त्यांनी असाच एक अभिनव उपक्रम करून देश सेवेसाठी योगदान दिले होते. विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती जतन होत ती संवर्धित होण्यासाठी कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी हे सर्जनशील उपक्रम हाती घेत असतात. रेखाटन कौशल्यातून व रंगशलाकाच्या कुंचल्यातून प्रतिबिंबित होणारी 75 चित्रे रसिक मनाला व भारतीय नागरिकांना मोहिनी घालणारे ठरले आहेत. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

75 मिनिटांच्या अखंडित कालावधित कलाशिक्षक माळी यांनी कलात्मकतेने तिरंगा प्रतिमा विविधतेने साकारल्या आहेत. त्यात हर घर तिरंगा, पक्षी, जय हिंद, इंडिया, अशोक चक्र, पतंग, आय लव इंडिया , राखी अशा भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतीक ठेवा असलेल्या प्रतिकांना रंगभरण करून 75 प्रतीत चित्रीत केल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

हेही वाचा

Back to top button