पुणे : विवाह झाले, अनुदान कुठंय? आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतील प्रस्तावांसाठी निधीच नाही | पुढारी

पुणे : विवाह झाले, अनुदान कुठंय? आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतील प्रस्तावांसाठी निधीच नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र आणि राज्य शासनाकडून आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. मात्र, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना या योजनेनुसार देण्यात येणार्‍या अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या 776 जणांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केले असून, त्यांना देण्यासाठी निधीच नाही. जिल्ह्यामध्ये योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अर्जांची संख्या वाढत आहे. प्रतिसाद वाढत असला तरी 2022-2023 वर्षीचे सर्व पात्र लाभार्थी अद्याप निधीअभावी अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या पाच वर्षांतील 1 हजार 564 लाभार्थ्यांना अनुदान देणे अद्याप बाकी आहे. तर 1 हजार 170 जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

2017-18 मध्ये सर्वाधिक 400 दांपत्यांना लाभ देऊन दोन कोटी निधीचे वाटप करण्यात आले आहे. 2019-20 मध्ये 376 लाभार्थ्यांना 1 कोटी 88 लाखांचे अर्थसाह्य मिळाले. 2016-17 मध्ये 177 जणांना 88 लाख पन्नास हजारांचे आणि 2020-2021 मध्ये 188 लाभार्थ्यांना 94 लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. आंतरजातीय विवाहीत दांपत्यांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज दाखल केल्यानंतर सर्व प्रकियेनंतर पन्नास हजार रुपये आर्थिक साह्य मिळते.

जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला. त्या अर्जांची प्रशासनाकडून छाननी करून 776 प्रस्ताव तयार केले. परंतु, त्यांना लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निधीचा एक रुपयाही केंद्र व राज्य सरकारने दिलेला नाही.

अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
विवाह नोंदणी दाखला
वर-वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि दोघांचा एकत्र फोटो
दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला
वर व वधू यांचा जातीचा दाखला
दोन प्रतिष्ठित व्यक्तींची प्रत्येकी दोन शिफारसपत्रे
संयुक्त बँक खाते असलेले पासबुक
शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
अर्ज जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग येथे उपलब्ध होईल

सर्व प्रस्ताव तपासून तयार करून ठेवले आहेत. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ निधी वर्ग करण्यात येईल. चालू वर्षीच्या लाभार्थ्यांसाठी 3 कोटी 88 लाख रुपयांची आवश्यकता आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

                                        -प्रवीण कोरगंटीवर, समाजकल्याण अधिकारी, जि. प.

वर्षनिहाय लाभार्थ्यांची संख्या
वर्ष अर्थसाह्य मिळालेले प्रलंबित
2016-17 177 – –
2017-18 400 – –
2018-19 29 – –
2019-20 376 – –
2020-21 – 188 – –
2022-23 776 776

Back to top button