धक्कादायक ! रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू, नाशिकच्या पेठ येथील घटना | पुढारी

धक्कादायक ! रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू, नाशिकच्या पेठ येथील घटना

पेठ (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने त्याचबरोबर योग्य औषधोपचार न मिळाल्याने कोटंबी येथील गरोदर माता कांचन सुरेश वार्डे (30) हिचा मृत्यू झाला. तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पेठ हे गाव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील असून, आदिवासी भागातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती विदारकच असल्याचे यातून पुन्हा उघड झाले आहे.

पेठ येथील आरोग्य विभागाच्या अनास्थेपायी चौदा महिन्यांपूर्वी महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज हा दुसरा बळी ठरला आहे. पेठसारख्या आदिवासी भागातील आरोग्यव्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजले असल्याचे उघड झाले आहे. देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याच्या दिंडोरी लोकसभाअंतर्गत असलेल्या पेठच्या ग्रामीण रुग्णालयात गेल्या दहा वर्षांपासून स्त्रीरोगतज्ज्ञाचे पद रिक्त आहे. हे पद भरण्याची वारंवार मागणी करूनही ते भरले जात नाही. याचा फटका कोटंबी येथील गरोदर महिलेला बसला आहे. तिने जीव गमावला,  तिच्या पोटातील बाळाला जग पाहण्याचे भाग्यही लाभले नाही. पेठ आरोग्य केंद्राकडून कांचन यांना योग्य पद्धतीने औषधोपचार देण्यात आला नसल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला. भविष्यात अशी घटना घडू नये याकरिता स्त्रीरोगतज्ज्ञ यांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button