Nashik Goda Ghat Aarti | गोदा महाआरतीसाठी ११.७७ कोटी | पुढारी

Nashik Goda Ghat Aarti | गोदा महाआरतीसाठी ११.७७ कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दक्षिणवाहिनी गोदावरीच्या महाआरतीसाठी राज्य शासनाने ११ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रामकुंड परिसरात महाआरतीसाठी कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नाशिककरांचे स्वप्न साकार होणार आहे.

वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरी नदीची भव्यदिव्य महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. महाआरतीसाठी आवश्यक निधीसाठी मंगळवारी (दि. ६) मुंबई येथे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. बैठकीत महाआरतीकरिता ११ काेटी ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यावर मोहोर उमटविण्यात आली. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून रामकुंड येथे ११ प्लॅटफाॅर्म, महाआरतीसाठीची साहित्य, एलईडी स्क्रीन, रामकुंड भागात वाहनतळ व दोन हायमास्ट बसविणे, तसेच आरतीकरिता येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सुविधा आदी प्रकारचे कामे केली जाणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीचा महाआरतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात होता. नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणसह अन्य यंत्रणांनी ५६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. मंत्री मुनगंटीवार यांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीप्रसंगी हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, आराखड्यात अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने पहिल्या टप्प्यात आरतीसंदर्भात महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यासाठी १० काेटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन देतानाच तातडीने प्रस्ताव सादर करायला सांगितले. त्यानुसार जिल्हास्तरावरून ११ कोटी ७७ लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला हाेता. त्यास मुनगंटीवार यांनी मान्यता देतानाच निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या १९ तारखेला गोदावरी नदीच्या प्रगट दिनापासून महाआरतीचे स्वर नाशिककरांच्या कानी पडणार आहे.

निधी मिळाला वाद कायम
राज्य शासनाने गोदेच्या महाआरतीसाठी ११ कोटी ७७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महाआरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, निधी मिळाला असला तरी महाआरतीवरून उद‌्भवलेला वाद कायम आहे. गोदारतीसाठी गठीत रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या कारभारावरून सर्वत्र वादाचे मोहोळ उठले आहे. गठीत समिती विश्वासात घेत नसल्याची पुरोहित संघाची तक्रार आहे. तर साधू-महंतांमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यामुळे निधी मिळाला तरी वाद कायम असणार आहे.

हेही वाचा:

Back to top button