पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सादर करण्यात आलेल्या नाटकाचे पडसाद विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पाहायला मिळाले. व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रभू श्री रामाच्या घोषणा देत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला. तसेच, ललित कला केंद्राच्या संबंधित प्राध्यापकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे व सहा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी विद्यापीठात आंदोलने केली. तसेच, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे याबाबत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. विद्यापीठाच्या अमृत महोत्सव वर्षातील वर्धापन दिनाच्या तयारी संदर्भात मंगळवारी (दि.6) विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीला काही सदस्य 'जय श्री राम .., जय श्री राम..', अशा प्रभू श्री रामाच्या घोषणा देत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत दाखल झाले. या सदस्यांनी नाटकामुळे समाजात निर्माण झालेल्या विद्यापीठाच्या प्रतिमेबाबत खंत व्यक्त केली. तसेच, विभाग प्रमुख डॉ. भोळे
यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र विखे पाटील, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर, डी. बी. पवार, संगीता जगताप या सदस्यांनी विद्यापीठात
सादर झालेल्या नाटकाबाबत असंतोष व्यक्त केला. दुपारी तीन वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावली होती.
हेही वाचा