Shree Khandoji Maharaj Namsaptah : पिंपळनेच्या नामसप्ताहाचे यंदाचे 195 वे वर्ष, काय आहे पंरपरा ? | पुढारी

Shree Khandoji Maharaj Namsaptah : पिंपळनेच्या नामसप्ताहाचे यंदाचे 195 वे वर्ष, काय आहे पंरपरा ?

पिंपळनेर: (ता.साक्री) अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर या पुण्यभूमीला ऐतिहासिक, राजकीय सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा आहे. येथे 244 वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर आहे. धार्मिक, अध्यात्मिक सांस्कृतिक संगमाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या येथील नामसप्ताहाचे यंदाचे 195 वे वर्ष आहे. खंडोजी महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा विठ्ठल मंदिर संस्थानाचा हा महोत्सव धार्मिक एकता जातीय सलोखा कला, संस्कृती यांचा संगम आहे. (Shree Khandoji Maharaj Namsaptah)

संबधित बातम्या :

1925 ला अनंतराव महाराजांचे पुत्र राजाराम महाराज गादीवर बसले. 1922 मध्ये झालेला मुळशी सत्याग्रह व दांडी यात्रेतील सहभागाबद्दल त्यांनी कारावास भोगला. सर्व जाती धर्मासाठी खुल्या असणा-या विठ्ठल मंदिरास त्या काळी महात्मा गांधी, डॉ.राजेंद्र प्रसाद, वि.दा.सावरकर आदींनी भेट दिली होती. 1974 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र श्रीकांत (भाऊ महाराज) देशपांडे संस्थानच्या गादीवर आले. मंदिराच्या जीर्णोध्दारास त्यांनी प्रारंभ केला. त्यांचा ‘महाभारत रहस्य’नावाचा ग्रंथ प्रकाशित असून, महाराष्ट्रासह इतरत्र तीर्थक्षेत्रांवरही त्यांनी भागवत सप्ताहाचे यशस्वी संयोजन केले होते. भाऊ महाराजांचे नुकतेच निधन झाले त्यांचे पूत्र योगेश्वर महाराज देशपांडे संस्थानच्या गादीवरचे 11 वे पुरुष आहेत. त्यांचीही मोठ-मोठ्या शहरांमध्ये कीर्तन व प्रवचने होतात. श्री योगेश्वर महाराज हे सध्या संस्थानचा कारभार बघतात. त्यांचीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी किर्तन, प्रवचन भागवताचे कार्यक्रम होत असतात. ते बी.एसस्सी. एम.ए. आहेत. त्यांनीही मंदिराच्या जीर्णोध्दाराचे अपूर्ण काम पुढे सुरु ठेवले आहे. विशेष म्हणजे कुठलाही देणगीची अपेक्षा न ठेवताच जीर्णोध्दाराचे काम सुरु आहे. त्यांचेही पप्रांतात भागवताचे कार्यक्रम होता. सध्या पिंपळनेरच्या विठ्ठल मंदिर संस्थानात योगेश्वर महाराजांच्या नेतृत्वाखाली वसंत चिंधू कोतकर, श्रीनिवास राजाराम देशपांडे, वासू नाना देशपांडे, आनंद महाराज देशपांडे, विजयराव देशपांडे, श्रीराम देशपांडे, यांच्यासह ग्रामस्थ कार्यरत आहेत. (Shree Khandoji Maharaj Namsaptah)

वर्षानुवर्षांची परंपरा असलेला खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नामसप्ताहाने विठ्ठल मंदिरात होत असला तरी पिंपळनेर व पंचक्रोशीतील भाविकांसाठी ती पर्वणीच असते. या मंदिरात ठिकठिकाणीहून दिंड्या येतात. त्यात आदिवासींच्या दिंडींना मानाचे स्थान असते. सर्व जातीधर्माचे लोक या नामोत्सवात सहभागी होतात. संस्थानचे सहावे पुरुष सखाराम महाराज व बाबा मियाँ पिरजादे जहागीरदार यांचे सलोख्याचे संबंध होते. उत्सवकाळात मंदिराचा पसाद शिद्याच्या रुपात जहागीरदार परिवाराला देण्याची, मंदिराच्या पालखीचे जहागीरदार कुटुंबाकडून मशिदीजवळ स्वागत करण्याची व मंदिरात महाराजांना मानाची वस्त्रे व नारळ देण्याची प्रथा आहे. दीडशे वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेली ही प्रथा आजही कायम आहे. या उत्सवाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन पिंपळनेर शहरात घडते.

पावसाळा सुरु झाला की, परिसरातील जनतेला पिंपळनेरात होणान्या वर्षानुवर्षांची परंपरा नामसप्ताहांचे वेध लागतात. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बालाजी मंदिराच्या नामसप्ताहापासून सप्ताहांना प्रारंभ होतो. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मुरलीधर मंदिर संस्थानतर्फे श्रावण वद्य प्रतिपदेला नामसप्ताह केला जातो. मुरलीधर मंदिराच्या नामसप्ताहाचे यंदाचे 116 वे वर्ष होते.

‌भाद्रपद शुध्द प्रतिपदेला (पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी) यादवराव महाराजांनी पुण्यतिथी असल्याने या दिवसांपासून विठ्ठल मंदिराच्या नामोत्सवाला प्रारंभ होतो. भाद्रपद शुध्द सप्तमीला खंडोजी महाराजांची पुण्यतिथी असते. या दिवशी ग्रामस्थ पांझरा नदी किनारी असलेल्या महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. अष्टमीच्या दिवशी रात्रीपासून यात्रा भरते. रात्र जागून काढायची असते त्यामुळे या रात्रीला कत्तलची रात्रही म्हणतात. या रात्री पारंपारिक पध्दतीने वहन (सोंगे) काढतात. सामाजिक जागृती करणारे, कलेची जोपासना करणारे सजीव चित्ररथांचे देखावे लक्षवेधी ठरतात. बडोदे संस्थांकडून मिळालेल्या पालखीतून सहाशे वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाच्या मूर्तीची रात्री 12 ला विठ्ठल मंदिरापासून मिरवणूक निघते. याच पालखीतून साडेतीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित गीता, खंडोजी महाराजांच्या पादूकाही असतात त्यामुळे चैतन्याला उधाण येते.

हेही वाचा :

Back to top button