पुण्यात कोंडीच्यावेळी पोलिसांची एकत्र कारवाई; 3 हवालदारांचे तडकाफडकी निलंबन | पुढारी

पुण्यात कोंडीच्यावेळी पोलिसांची एकत्र कारवाई; 3 हवालदारांचे तडकाफडकी निलंबन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डेक्कन वाहतूक विभागातील तिघा पोलिस हवालदारांना वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. रस्त्यावर कोंडी झाली असतानादेखील वाहतूक नियमनाचे काम सोडून तिघे एकत्र कारवाई करताना आढळून आले होते. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे त्यांनी आपली खिशावरील नेमप्लेट झाकून ठेवली होती.

दरम्यान, दैनिक ’पुढारी’ले सर्वप्रथम वृत्त प्रदर्शित करून वाहतूक पोलिस कसे आडोशाला टोळक्याने एकत्र येऊन नेमप्लेट झाकून ठेवत कारवाई करीत आहेत, हे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. जितेंद्र दत्तात्रय भागवत, जयशिंग यशवंत बोराणे, गोरख मारुती शिंदे (सर्व नेमणूक डेक्कन वाहतूक) अशी निलंबित पोलिस हवालदारांची नावे आहेत.

शनिवारी (दि. 16) पोलिस उपायुक्त मगर हे जंगली महाराज रोडवर होते. त्या वेळी प्रभात रस्त्यावरील हॉटेल रॉयल्टी व त्यापुढे वाहतूक कोंडी झाली असून, दोन्ही बाजूने वाहने लागलेली आहेत. तत्काळ कारवाई करून वाहतूक सुरळीत करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. डेक्कन वाहतूक विभागाला माहिती मिळाल्यानंतर ठाणे अंमलदार पाटील यांनी संबंधित कर्चमार्‍यांना ही माहिती दिली तसेच टेम्पो आणि क्रेन ऑपरेटरला सांगितले.

दरम्यान, पोलिस उपायुक्त मगर हे लॉ कॉलेज रोडने भांडारकर रोडकडे जात असताना हे तिघे हवालदार वाहतूक नियमन सोडून एकत्र कारवाई करताना आढळून आले. त्यांनी डेक्कन विभागातील प्रभारी अधिकार्‍यांना ही माहिती दिली होती. दरम्यान, परिसरात वाहतूक कोंडी झाली असतानादेखील हे तिघे हवालदार कारवाई करताना मिळून आले.

हेही वाचा

Konkan Ganeshotsav : मळगावातील ८० कुटुंबांचा एक गणपती !

पुणे : ‘एमआयटी एडीटी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

शेवगाव तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींचे मतदार अंतिम !

Back to top button