नाशिक महापालिकेत ‘शंभर प्लस’ मिशन, भाजपचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिला नारा | पुढारी

नाशिक महापालिकेत 'शंभर प्लस' मिशन, भाजपचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिला नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारताला जगात विश्वगुरू बनविण्याच्या कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. त्यांचा आदर्श डोळयापुढे ठेवत पक्षबांधणीसाठी अहोरात्र कार्य करणार आहे. नाशिक महानगर हा भाजपचा बालेकिल्ला असून, तो अभेद्य ठेवताना महापालिका निवडणुकीत पक्षाचे शंभर प्लसचे उद्दिष्ट ठेवून ते पार पाडू, असा नारा भाजपचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिला.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी (दि.२२) पक्षातर्फे जाधव यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मावळते शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील, प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, अनिल भालेराव, अमित घुगे, गायत्री जाधव आदी उपस्थित होते.

प्रशांत जाधव पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल. 2024 च्या लोकसभा व विधानसभेतील ऐतिहासिक विजयासाठी आपण अहोरात्र कार्य करायचे आहे. सर्व प्रकारच्या आघाड्या व प्रकोष्ठ यांची मजबूत बांधणी करून बूथरचनेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करू या, असेही जाधव यांनी सांगितले.

गिरीश पालवे यांनी मनोगतात संघटनात्मक कार्याचा प्रशांत जाधव यांना व्यापक अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा त्यांना अध्यक्ष कारकिर्दीसाठी नक्कीच फायदा होईल. जगन पाटील यांनी प्रास्ताविक केले. पवन भगूरकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील केदार यांनी आभार मानले. यावेळी पक्षाचे मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध प्रकोष्ठ आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button