नाशिक लोकसभेसाठी भाजपची रणनीती, जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा | पुढारी

नाशिक लोकसभेसाठी भाजपची रणनीती, जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षपूर्तीचे औचित्य साधत भाजपने राज्यभर महा-जनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. अभियानासाठी पक्षाचे केंद्रीय मंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना थेट राज्यात पाचारण केले जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची २६ जूनला नाशिक दौऱ्यावर येत असून, नाशिकच्या कार्यकारिणीला ते संबोधित करतील. तसेच दौऱ्याच्या आडून भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली असून, पक्षाने राज्यात ४५ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांत महा-जनसंपर्क अभियान हाती घेत एकप्रकारे निवडणुकीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जातोय. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या मतदारसंघातही भाजपकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्या पुढे जाऊन भाजपने आता सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातही महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून कानोसा घ्यायची तयारी चालविली आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांनाच नाशिकमध्ये पाचारण करण्यात आले आहे.

भाजपच्या नाशिक कार्यकारिणीची बैठक येत्या २६ तारखेला शहरात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या समारोपाला नड्डा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यादिवशी त्यांची जाहीर सभाही घेण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे. हा दौरा म्हणजे मोदी @9 चा एक भाग असल्याचा प्रचार भाजपकडून करण्यात येत असला तरी आगामी नाशिक लोकसभेच्या दृष्टीने नड्डा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले असताना भाजपच्या या रणनीतीमुळे सेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भेटीगाठींवर भर

नाशिक दाैऱ्यात अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार असून, जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत. याप्रसंगी नड्डा भेटीगाठींमधून आगामी निवडणुकांबद्दल कानोसा घेतील. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, त्यादृष्टीने पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयारीवर भर दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button