कोल्हापूर : थेट पाईपलाईनचा ‘मार्ग’ मोकळा | पुढारी

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचा ‘मार्ग’ मोकळा

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूरवासीयांसाठी जिव्हाळ्याची असलेली तब्बल 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना अंतिम टप्प्यात आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात 2015 सालात बांधण्यात आलेला तब्बल दीडशे फूट उंचीचा कॉपर डॅम मंगळवारी फोडून पूर्ण झाला. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढल्यानंतर लगेच इंटेकवेलमध्ये पाणी येईल. तेथून इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2 मार्गे ते पाणी दोन्ही जॅकवेलमध्ये जाईल. शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे थेट पाईपलाईन वरदान ठरणार आहे.

2045 पर्यंत पाण्याचे ‘नो टेन्शन’

कोल्हापूर शहराची 2045 सालातील संभाव्य लोकसंख्या 10 लाख 29 हजार इतकी गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार दैनंदिन 238 एम.एल.डी. इतकी पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज ओळखून थेट पाईपलाईन योजना आखण्यात आली आहे. काळम्मावाडी धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 2.3 टी.एम.सी. (76.85 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवला आहे. सद्यस्थितीत दररोज 180 ते 200 एम.एल.डी. पाण्याचा उपसा केला जाणार आहे. 2040 सालानंतर गरजेनुसार पाणीपुरवठ्यासाठी धरण क्षेत्रात आणखी पंप वाढविण्यात येणार आहेत. परिणामी, 2045 सालापर्यंत कोल्हापूरकरांना पाण्याचे ‘टेन्शन’ राहणार नाही.

53 कि.मी. पाईपलाईन

काळम्मावाडी धरणातील पाणी कोल्हापूरपर्यंत आणण्यासाठी 53 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तब्बल सहा फूट उंचीची म्हणजे एक व्यक्ती पाईपलाईनमध्ये पूर्ण उभा राहू शकेल इतकी मोठी ही पाईपलाईन आहे. त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तसेच बिद्री ते काळम्मावाडी 27 किलोमीटर विद्युतवाहिन्या टाकण्यात येत आहेत.

‘स्काडा’ सिस्टीमने कळणार गळती

थेट पाईपलाईन योजनेत ‘स्काडा’ सिस्टीम अंमलात आणली जाणार आहे. योजनेंतर्गत लोकेशन बघून 11 ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. त्यावर सेन्सर बसविण्यात आल्याने संपूर्ण पाईपलाईन स्क्रीनवर दिसणार आहे. त्याचे नियंत्रण केंद्र पुईखडी व जलअभियंता यांच्या कार्यालयात असणार आहे. 53 किलोमीटर पाईपलाईनला कुठेही गळती लागली किंवा अडचणी निर्माण झाल्यास ऑटो ऑपरेटिव्ह सिस्टीमद्वारे त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत.

‘कॉपर डॅम’ म्हणजे काय?

काळम्मावाडी धरणात 2015 सालात कॉपर डॅम बांधण्यात आला. सुरुवातीला त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात थेट पाईपलाईन योजनेंतर्गत केलेली कामे धरणातील पाण्यात बुडत होती. त्यानंतर डी वॉटरिंग (पाण्याचा उपसा करून ते क्षेत्र रिकामे करणे) करूनच कामाला सुरुवात करावी लागत होती. जॅकवेलपासून 300 मीटर लांब काळम्मावाडी धरण क्षेत्रात कॉपर डॅम बांधण्यात आला आहे. सुमारे दीडशे फूट उंच आणि 500 मीटर लांब असलेला हा कॉपर डॅम म्हणजे छोटासा बंधारा आहे. कॉपर डॅममुळे धरण क्षेत्रातील पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे थेट पाईपलाईन योजनेची धरण क्षेत्रातील कामे करण्यासाठी संपूर्ण भाग पाण्याशिवाय रिकामा करण्यात आला आहे. या रिकाम्या भागात थेट पाईपलाईन योजनेसाठी इंटेकवेल, इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2, जॅकवेल क्र. 1 व 2 ही कामे करण्यात आली आहेत. त्यानंतर मंगळवारी कॉपर डॅम फोडून पूर्ण झाला.

ब्रेक प्रेशर टँक

जॅकवेलमधील पाणी ब्रेक प्रेशर टँकमध्ये घेतले जाणार आहे. त्यासाठी धरण क्षेत्राच्या बाहेर 15 लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. जॅकवेल ते ब्रेक प्रेशर टँक 100 मीटर अंतर आहे. जॅकवेल क्र. 1 व जॅकवेल क्र. 2 मधून 1.2 मीटर व्यासाच्या पाईपमधून ते पाणी ब्रेक प्रेशर टँकमध्ये नेण्यात येणार आहे. तेथून ग्रॅव्हिटीने कोल्हापूर शहरातील पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येणार आहे.

जुळी जॅकवेल

थेट पाईपलाईन योजनेसाठी सर्वात महत्त्वाची जॅकवेल आहेत. योजनेसाठी धरण क्षेत्रात स्वतंत्र अशी जुळी जॅकवेल बांधण्यात आली आहेत. त्यांची खोली तब्बल 150 फूट आहे. दोन्ही जॅकवेलचा व्यास प्रत्येकी 18 मीटर इतका आहे. या महाकाय दोन्ही जॅकवेलमध्ये धरणातील पाणी इंटेकवेल, इन्स्पेक्शन वेलद्वारे येणार आहे. थोडक्यात, या टाक्यांमध्ये धरणातील पाण्याचा साठा होणार आहे.

इन्स्पेक्शन वेल

धरणातील पाणी इंटेकवेलमध्ये जमा झाल्यानंतर ते इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व इन्स्पेक्शन वेल क्र. 2 मधून जॅकवेलमध्ये नेण्यात येणार आहे. इंटेकवेल ते इन्स्पेक्शन वेल क्र. 1 हे अंतर 70 मीटर असून, त्याची पाईपलाईन 1.8 मीटर व्यासाची आहे. इन्स्पेक्शन वेल क्र. 1 ते इन्स्पेक्शन वेल क्र. 2 चे अंतर 70 मीटर असून, त्याची पाईपलाईन 1.8 मीटर व्यास आहे. इन्स्पेक्शन वेल क्र. 2 पासून जॅकवेल क्र. 1 जॅकवेल क्र. 2 कडे 100 मीटर पाईपलाईन टाकून जोडण्यात आली आहे. ही पाईपलाईन 1.4 मीटर व्यासाची आहे.

पंपहाऊस

दोन्ही जॅकवेल पंपहाऊस बांधण्यात येत आहेत. प्रत्येकी 940 हॉर्सपॉवरचे चार पंप आहेत. जॅकवेल क्र. 1 वर दोन पंपहाऊस, तर जॅकवेल क्र. 2 वर दोन पंपहाऊस असणार आहेत. या पंपांद्वारे जॅकवेलमधील पाण्याचा उपसा केला जाणार आहे. त्यानंतर हे पाणी ब—ेक प्रेशर टँकमध्ये सोडण्यात येणार आहे.

पुईखडी येथे जलशुद्धीकरण केंद्र

काळम्मावाडी धरणातील पाणी ग्रॅव्हिटीने पुईखडी येथे आणले जाणार आहे. त्यासाठी पुईखडी येथे 80 एम.एल.डी. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधले गेले आहे. या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते शहरातील संप हाऊस आणि पाण्याच्या टाक्यांत वितरित केले जाणार आहे. त्यानंतर सुमारे सातशे किलोमीटर लांबीच्या अंतर्गत वितरण नलिकेद्वारे शहरवासीयांना पाणी मिळणार आहे.

इंटेकवेल

थेट पाईपलाईन योजनेचा काळम्मावाडी धरण क्षेत्रात हा पहिला भाग आहे. इंटेकवेल 30 फूट खोल असून, त्याचा व्यास साडेचार मीटर इतका आहे. जॅकवेलपासून 310 मीटर लांब इंटेकवेल आहे. धरणातील पाणी या इंटेकवेलमध्ये जमा होणार आहे. इंटेकवेलमधील पाणी ग्रॅव्हिटीने जॅकवेलमध्ये येणार आहे. त्यानंतर हेच पाणी कोल्हापूरपर्यंत येणार आहे. त्यामुळे योजनेसाठी इंटेकवेल अत्यंत महत्त्वाची आहे.

Back to top button