नाशिक : गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी चौघा महिलांची टोळी जेरबंद | पुढारी

नाशिक : गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी चौघा महिलांची टोळी जेरबंद

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

वणीत आठवडे बाजारात, बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या संशयित महिलांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वणीत दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी वणी बसस्थानकावर आजूबाजूच्या खेडेगावांतून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. गेल्या काही दिवसांत वणी परिसरात प्रवासात महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. या चोऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मंगळवारी दिवसभर वणी पोलिसांनी बसस्थानकात साध्या गणवेशात पाळत ठेवणारी पथके तैनात केली होती. या पथकाने वणी स्थानकात सुलोचना सोनवणे (वय ४५, रा. लोहोणेर, ता. सटाणा), बेबीबाई कसबे (वय ५०, रा. चाळीसगाव), रंजना लोंढे (वय ४०, रा. सटाणा) तसेच अकील शेख (वय ४९, रा. सटाणा) या चौघींना संशयास्पदरीत्या फिरताना ताब्यात घेतले. गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणारी टोळी म्हणून त्या काम करत असल्याचे चौकशीत उघड झाले. या चौघी तोंडाला स्कार्फ बांधून बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलेच्या आजूबाजूस घोळका करून तिला घेरत आणि गळ्यातील सोन्याचे दागिने तोडून चोरी करत.

या चौघींनी नाशिक जिल्ह्यात निफाड, लासलगाव, सिन्नर, मालेगाव तालुका, चाळीसगाव या ठिकाणी अशाच पद्धतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण उदे, पी. टी. जाधव, पोलिस हवालदार एच. के. चव्हाण, अण्णा जाधव, संजय दळवी, किरण गांगुर्डे, विजय खांडवी, सुरेश चव्हाण, राहुल आहेर, मनीषा गायकवाड, वनिता आहेर या पथकाने या चौघा महिलांना पकडले.

हेही वाचा :

Back to top button