इचलकरंजीत सूत खरेदीत दोन कोटींची फसवणूक | पुढारी

इचलकरंजीत सूत खरेदीत दोन कोटींची फसवणूक

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : सूत खरेदी व्यवहारात बोगस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून 1 कोटी 87 लाख 2 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील बडे सूत व्यापारी पंकज पुष्पक अग्रवाल व प्रवीण पुष्पक अग्रवाल (रा. कागवाडे मळा परिसर) या दोघा भावांना अटक केली. तसेच पीयूष पंकज अग्रवाल, मयूर पंकज अग्रवाल, पुष्पक अग्रवाल व प्रीतेश शहा या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोपीकिशन हरिकिशन डागा (वय 44, रा. प्रकाश लाईट हाऊससमोर, इचलकरंजी) यांनी फसवणुकीची फिर्याद दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोपीकिशन डागा यांच्या श्री हनुमान यार्न सिंडीकेट व श्री हरी सिंटेक्स प्रा. लि. अशा दोन फर्म आहेत; तर संशयित पंकज अग्रवाल याची पीयूष टेक्स्टाईल कंपनी आहे. सूत व्यापारी असलेल्या पंकज अग्रवाल याने पीयूष टेक्स्टाईल्सच्या माध्यमातून डागा यांच्याकडून वेळोवेळी सूत खरेदी केले होते. सुरुवातीच्या काळात अग्रवाल याने वेळेवर रक्कम देऊन डागा यांचा विश्वास संपादन केला.

12 डिसेंबर 2022 ते 9 जानेवारी 2023 या कालावधीत अग्रवाल याने सूत खरेदी केले. त्यापोटीही अग्रवाल याने एनईएफटी केल्याचे सांगत डागा यांना यूटीआर क्रमांक पाठविला. डागा यांनी बँकेत जाऊन यूटीआर क्रमांकाची खात्री केली असता, तो बोगस असल्याचे निदर्शनास आले. अग्रवाल याने बोगस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून 1 कोटी 87 लाख 2 हजार 133 रुपयांची फसवणूक केल्याचे डागा यांच्या निदर्शनास आले. डागा पैसे मागण्यासाठी गेले असता पंकज अग्रवाल व पीयूष अग्रवाल तसेच इतरांनी पैसे देणार नाही, काय करायचे ते कर, पुन्हा येथे आलास, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही डागा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button