Nashik Child Trafficking : गोंधळलेल्या मुलांना चाइल्ड लाइनचा आधार | पुढारी

Nashik Child Trafficking : गोंधळलेल्या मुलांना चाइल्ड लाइनचा आधार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिसांच्या गराड्यातून एका खोलीत जमा झालेल्या ८ ते १५ वयोगटातील मुले भेदरलेली होती. काय चालले आहे किंवा नेमके काय झाले याची कोणतीही कल्पना या मुलांना मिळत नव्हती. ‘तुझे नाव काय? तू कुठून आला?’ असे प्रश्न विचारले तरी मुलं काहीच बोलेना. फक्त एकमेकांकडे पाहत होती. मात्र चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांनी लहान मुलांना धीर देत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना बोलते केले. त्यानंतर काही वेळातच सर्व मुलांनी त्यांची पूर्ण नावे, पत्ता सांगत प्रवासाचेही वर्णन दिले. त्यामुळे पोलिसांच्या तपासालाही गती मिळाली.

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी (दि.३०) राबविलेल्या मोहिमेत दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून ८ ते १५ वयोगटातील ५९ मुलांची सुटका केली. पोलिस तपासात पुणे येथील मदरशात नेण्याच्या बहाण्याने बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत मुलांची तस्करी होत असल्याचे समोर आले. जळगाव येथे २९ व मनमाड येथे ३० मुलांना उतरवण्यात आल्यानंतर या मुलांची चौकशी करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे बालकल्याण समितीच्या आदेशानुसार चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांनी मुलांची विचारपूस केली. मात्र, स्वत:च्या प्रवासाबद्दल अनभिज्ञ असलेल्या मुलांना काय होत आहे, याची कल्पना नसल्याने ते गोंधळलेल्या व घाबरलेल्या स्थितीत होती. त्यामुळे या मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून माहिती मिळवणे आवश्यक होते. समुपदेशकांनी मुलांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सुरुवातीस कोणीही माहिती देत नव्हते. प्रश्न विचारले की, ते एकमेकांकडे पाहत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सर्व माहिती दिली. त्यामुळे प्रशासनालाही तपासास दिशा मिळाली. या मुलांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांची द्वारका येथील आस्था खुले निवारागृह व उंटवाडी येथील मुलांचे गृहात ठेवण्यात आले आहे.

यांनी दिला धीर

चाइल्ड लाइनचे समुपदेशक प्रवीण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सचिन शिराळ, किरण वनीस, निखील पाटील, रुतुज देशमुख, हिमांशू वनीस, अनिकेत लमखाने यांनी मुलांशी संवाद साधून त्यांची माहिती संकलित केली. तसेच मुलांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हेही वाचा :

Back to top button