Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष! | पुढारी

Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने १३ जणांचे बळी गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात एक असे ११३ कक्ष स्थापन होणार आहेत. या वातानुकूलित कक्षामध्ये पाणी, प्राथमिक किट, थंडावा निर्माण करणारी फळे यांचा समावेश असणार आहे.

केंद्र सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक तालुक्याने, प्रा. आ. केंद्राने या मार्गदर्शक सूचनांनुसार आपला उष्णता कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हास्तरीय डेथ ऑडिट कमिटीमार्फत नियमित करण्यात यावे. कोणत्याही मृत्यूचे डेथ ऑडिट एक आठवड्याच्या आत करावे, अशाही सूचना आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आरोग्य केंद्राने उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक ठिकाणी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यात बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, बँका, पेट्रोलपंप, मुख्य रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण कराव्या, धार्मिक स्थळे, धर्मशाळा दिवसभर लोकांसाठी खुल्या ठेवाव्यात. बागा, टेरेसना उष्णताविरोधी रंग लावावे, कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्या कामांच्या वेळा बदलाव्यात, यांचा समावेश आहे.

हीट वेव्ह म्हणजे काय ?
हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमानात ३ अंश सेल्सियसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट, असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे.

हेही वाचा : 

Back to top button