राज्यात यंदा वळवाची बाजी ! सरासरीपेक्षा 79 टक्के अधिक बरसला | पुढारी

राज्यात यंदा वळवाची बाजी ! सरासरीपेक्षा 79 टक्के अधिक बरसला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजवर प्रथमच राज्यात वळवाच्या पावसाने विक्रम नोंदवला आहे. 1 मार्च ते 18 एप्रिल 2023 या 49 दिवसांत महाराष्ट्रात सरासरीच्या 79 टक्के अधिक पाऊस झाला. सर्वाधिक कोकणात 161, मध्य महाराष्ट्रात 90, विदर्भात 88, तर सर्वांत कमी मराठवाड्यात 31 टक्के इतका बरसला आहे. यंदा बंगालच्या उपसागरातून सतत बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येत आहेत.

तसेच उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असल्याने त्या दोन्हींची टक्कर महाराष्ट्रावर होत आहे. परिणामी राज्यात संपूर्ण मार्च व एप्रिलचा अर्धा महिना हा पावसाचा ठरला. वळवाच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली असून, 24 एप्रिलपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याने पावसाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण पाऊस (79 टक्के) 1 मार्च ते 18 एप्रिल 2023 : कोकण 161 टक्के, मध्य महाराष्ट्र 90 टक्के, विदर्भ 88 टक्के, मराठवाडा 31 टक्के.

Back to top button