चिन्नास्वामीची खेळपट्टी ही गोलंदाजांची कबर | पुढारी

चिन्नास्वामीची खेळपट्टी ही गोलंदाजांची कबर

बंगळूर, वृत्तसंस्था : फिरकीपटू हरभजन सिंग याने बंगळूरच्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचे वाभाडे काढले असून, ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी कब्रस्तान आहे, अशा शब्दांत त्याने यावर टीका केली आहे. 40 षटकांत 440 धावा, हा शुद्ध वेडेपणा आहे, असेही तो म्हणाला.

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या 16 व्या हंगामात सर्व 10 संघ हे आपल्या होम ग्राऊंडवर खेळत आहेत. सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना झाला. या सामन्यात गारांचा नाही; मात्र धावांचा जोरदार पाऊस झाला. चेन्नईने 20 षटकांत तब्बल 226 धावा ठोकल्या, तर आरसीबीनेदेखील 218 धावा ठोकत चिन्नास्वामीची खेळपट्टी ही कशी गोलंदाजांची कबर ठरते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.

या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि हरभजन सिंग यांनी चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर सडकून टीका केली. मोहम्मद कैफ खेळपट्टीवर टीका करताना म्हणाला की, पाटा खेळपट्टी, छोटे ग्राऊंड, इम्पॅक्ट प्लेअर असा सामना पाहिल्यानंतर कोणाला गोलंदाज व्हावे, असे वाटेल का?

माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत म्हटल्यावर या गोष्टीकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अशा सामन्यांमुळे युवा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. तुषार देशपांडेने तीन विकेटस् घेतल्या; मात्र त्याच्या 4 षटकांत 45 धावा झाल्या. तर, श्रीलंकेच्या मथीशा पथिरानानेही 4 षटकांत 41 धावा दिल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाज पार्नेलचीदेखील अशीच अवस्था झाली होती. त्याने 4 षटकांत 48 धावा दिल्या.

Back to top button