आयकर : आयकर विवरणपत्राचे शंकानिरसन

आयकर : आयकर विवरणपत्राचे शंकानिरसन
Published on
Updated on
  • जगदीश काळे

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी अनेकांनी 31 मार्चपर्यंत गतवर्षीचे आयकर विवरणपत्र दाखल केलेले नाही. सदर व्यक्तींना 31 जुलैपर्यंत विलंब शुल्कासह आयकर रिटर्न भरावे लागणार आहे. आयटीआर फायलिंग हे एक मोठे जिकिरीचे काम वाटत असले तरी करपात्र उत्पन्न असणार्‍यांनी ते भरणे गरजेचे आहे.

आयकर विवरणपत्र भरताना देय तारीख, मूल्यांकन वर्ष, वित्त वर्ष, विलंब शुल्क, दंड, फॉर्म नं. 16, करसवलती अशा अनेक बाबींबाबत आजही अनेकांना काही समस्या उद्भवतात. तसेच याविषयी शंका असतात. त्यांचे निरसन होण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या.

1. आयटीआर भरताना पॅनऐवजी आधार किंवा आधारऐवजी पॅन वापरता येईल का?
– हो. सध्याच्या तरतुदींनुसार, तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही पॅन आणि आधार या दोन्हींचा परस्पर बदल करू शकता. म्हणजेच पॅनऐवजी तुम्ही आधार किंवा आधारऐवजी पॅन वापरू शकता.

2. आयटीआर भरताना कोणती कागदपत्रे द्यावी लागतात?
– टॅक्स रिटर्न भरताना कागदपत्रे देण्याची गरज नाही. तथापि, रिटर्नमध्ये काही त्रुटी निघाल्या आणि त्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तपासणी सुरू झाल्यास आपल्याला ही कागदपत्रे द्यावी लागतील.

3. फॉर्म 16 शिवाय आयटीआर दाखल करता येईल का?
– फॉर्म 16 हा नोकरदारांसाठी आयटीआर फाईल करण्यासाठीचा आवश्यक फॉर्म आहे. यामध्ये कर्मचार्‍यांच्या पगाराबद्दल संपूर्ण माहिती असते. पूर्वी करदात्यांना फॉर्म 16 शिवाय कर भरण्यात अडचणी येत होत्या. परंतु आता ते फॉर्म 16 चा संदर्भ न घेताही आयटीआर दाखल करू शकतात.

4. कृषी उत्पन्नासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
– कृषी उत्पन्नावर आयटीआर दाखल करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. परंतु शेतीतून मिळणारे उत्पन्न सवलतीच्या श्रेणीत येत असेल, तर त्याचा तपशील आयटीआर फॉर्ममध्ये शेड्यूल ईआय (एक्झम्प्ट इनकम) मध्ये द्यावा लागेल.

5. कलम 80 डीडीअंतर्गत आयकर रिटर्न भरताना काही कागदपत्रे द्यावी लागतात का?
– नाही. आयकर रिटर्न भरताना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. कोणतेही अपंगत्व किंवा गंभीर अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास, आयकर विभाग स्वत: तुमच्याकडून याबाबतच्या पुराव्याची मागणी करतो आणि तेव्हाच त्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागते.

6. विवरणपत्र भरले नाही, तर दंड आकारला जाईल का?
– देय तारखेपूर्वी आयकर भरला नाही, तर 5,000 रुपयांपर्यंत विलंब शुल्क भरावे लागू शकते. तथापि, तुमचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये दंडापोटी भरावे लागतील.

7. देय तारखेनंतरही विवरणपत्र भरता येते का?
– आयकर विवरणपत्र देय तारखेपूर्वी भरले नसेल तर त्यानंतर भरणार्‍या रिटर्नला विलंबित विवरणपत्र (बिलेटेड रिटर्न) म्हणतात. तथापि, हे विवरणपत्र संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपूर्वी 3 महिने आधी दाखल केले पाहिजे. ते भरत असताना तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. याखेरीज तुम्ही अपडेटेड रिटर्न देखील दाखल करू शकता. हे विवरणपत्र संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 24 महिन्यांच्या आत जमा केले जाऊ शकते.

8. रिटर्न भरणे आवश्यक नसेल आणि आपण उशिरा रिटर्न भरले तर विलंब शुल्क आकारले जाईल का?
– नाही. तुम्ही करपात्र उत्पन्न श्रेणीत येत नसाल आणि देय तारखेनंतर स्वेच्छेने आयटीआर भरत असाल तर तुम्हाला दंड आकारला जाणार नाही.

9. आयटीआर दाखल करण्याचे फायदे काय आहेत?
– सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आयकर विवरणपत्र भरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण याद्वारे तुम्ही देशाच्या विकासाचा एक भाग बनता. दुसरा फायदा म्हणजे नियमित आयटीआर भरल्यामुळे तुमची आर्थिक पत तयार होत जाते. याचे अनेक फायदे भविष्यातील आर्थिक व्यवहारांच्या वेळी मिळतात.

10. यावर्षी आर्थिक व्यवहारांमध्ये तोटा झाला असेल तर आयटीआर फाईल करणे आवश्यक आहे का?
– एखाद्या व्यक्तीला चालू आर्थिक वर्षात तोटा झाला असेल, तर पुढील वर्षाच्या नफ्यामध्ये तो तोटा समायोजित करता येतो. यासाठी, तुम्हाला देय तारखेपूर्वी आयटीआर भरताना नुकसानीचा दावा करावा लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news