नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद | पुढारी

नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव आगार महामंडाळाची गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली दिंडोरी वरखेडामार्गे पिंपळगाव जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरीची बससेवा अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

वरखेडा येथून दररोज कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहोत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शालेय वेळेत पिंपळगाव येथे जाणारी बससेवा बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. – समृद्धी गांगुर्डे, विद्यार्थी.

दिंडोरी-वरखेडा मार्गे पिंपळगाव जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा अनियमित झाल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर सर्वसामान्य जनतेचीही गैरसोय होत असून, प्रवाशांचेदेखील हाल होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दिंडोरी, वलखेड फाटा, लखमापूर फाटा, परमोरी, वरखेडा, कादवा सहकारी साखर कारखाना, सोनजांब फाटा, बोपेगाव व खेडगाव आदी गावांतून शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, सरकारी कामे, रुग्णालयीन उपचार, बाजारपेठा व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर अनियमित असणारी ही महामंडळाची एसटी बससेवा आता दहा ते पंथरा दिवसांपासून अचानक बंदच झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, शाळेत कसे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायी विद्यार्थ्यांना खासगी किंवा मिळेल त्या साधनाने प्रवास करून शाळेत हजेरी लावावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत व प्रवाशांच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी लेखी निवेदन देऊन दखल घेतली जात नाही.

विद्यार्थ्यांना ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर अथवा बैलगाडी अशा मिळेल त्या खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करत शाळेत जावे लागत आहे. ऐन शालेय वेळेतच बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासह तसेच इतर काही शासकीय कामांसाठी जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही बससेवा त्वरित सुरू करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. – केशव वाघले, सरपंच, वरखेडा.

हेही वाचा:

Back to top button