जळगाव : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भाजप नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांची हजेरी! | पुढारी

जळगाव : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भाजप नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांची हजेरी!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भाजप : सावदा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर हजेरी लावल्याने भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २०१६ साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत येथे भाजपच्या तिकिटावर अनिता पंकज येवले या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी तर अन्य नऊ जण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. हे सर्वजण एकनाथ खडसे यांचे समर्थक होते.

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भाजप

गेल्या वर्षाच्या अखेरीस खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचण नको, म्हणून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी पक्षांतर केले नाही.

तथापि, काही दिवसांपूर्वी सावदा शहरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपस्थिती लावली. याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली.

पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांनी अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत या नोटीसला उत्तर देण्याचे नमूद करण्यात आले आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून याला उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यात देण्यात आलेला आहे.

हे ही वाचलत का?

Back to top button