गोवा : समुद्राच्या पाण्यात पर्यटकाची स्टंटबाजी, पोलिसांनी दिला दणका
पणजी; पुढारी वृत्तसेवा : जिवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येणारे काही पर्यंटक सध्या पर्यटनासाठी डोकदुखी ठरत आहे. याची प्रचिती बुधवारी मोरजी समुद्रकिनार्यावर आली. मोरजी समुद्रकिनार्यावर घाईघाईने आणि निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पेडणे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पर्यटक मोरजी समुद्रकिनार्यावर आपली भाडेपट्टी तत्त्वावर घेतलेली हुडाय 20 कार (कार क्रमांक जी.ए.11 टी 2292) घेऊन स्टंट करत समुद्रातील पाण्यात उतरला.
यावेळी पाण्याची पातळी वाढल्यामुळे कार पाण्यात तरंगू लागली. हा प्रकार पाहताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेेऊन कार चालवणारा पर्यटक चालक गौरव बिश्वाड (25) यांच्यावर भा.दं.वि 279 ,336 अन्यये गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, येथील संबंधित गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
गोव्यात येऊन जिवाचा गोवा करताना बरेचसे पर्यटक दंगामस्ती करत नियमांचे उल्लघन करत आहेत. खास करून देशी पर्यटक नियम मोडत असल्याचे आढळून आले आहे. यात खास करून दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणे, समुद्राची पातळी वाढलेली असताना पाण्यात उतरणे, बेशिस्तपणे गाडी चालविणे, रस्त्याच्या बाजूला स्वंयपाक करणे अशी प्रकरणे वारंवार आढळून येत आहेत.
गोवा राज्य पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे घडणारे कोणतेही वाईट कृत्य गोवा पर्यटनाचे नाव जागतिक स्तरावर खराब करू शकते. त्यामुळे या विषयाकडे शासनाने गंर्भियाने लक्ष देणे व कडक कारवाईची मोहिम हाती घेणे अपेक्षित आहे.
शिस्तबद्ध पर्यटकांचे गोव्यात स्वागत…
गोवा पर्यंटक स्थळ आहे. त्यामुळे आम्हाला पर्यटक आलेले हवेच. मात्र शिस्तबद्ध पर्यटकांचे गोव्यात स्वागत आहे, असे विधान यापूर्वी कित्येकदा पर्यटक मंत्री मनोहर आजगावकर यांनी केले आहे. त्यामुळे अशा बेशिस्त पर्यटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यातील नागरिकांकडून होत आहे.

