INDvsENG 4th test D1 : अजिंक्यचा बळी देणार की मिळणार अभय? | पुढारी

INDvsENG 4th test D1 : अजिंक्यचा बळी देणार की मिळणार अभय?

लंडन : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत (INDvsENG 4th test D1) टीम इंडियासमोर संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे. कारण उपकर्णधारावरच गच्छंतीची टांगती तलवार आहे. गोलंदाजीतही काही बदल होण्याची शक्यता आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव झाला होता. पहिल्या डावात टीम इंडिया ७८ धावांत गुंडाळली गेल्याने संघाच्या फलंदाजी विभागात मोठी समस्या असल्याचे अधोरेखित झाले. पण, त्याच विकेटवर इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे फलंदाजी जात्यात तर गोलंदाजी सुपात आहे.

फलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाले तर मालिकेत मधल्या फळीने निराशा केली आहे. कर्णधार विराट कोहली मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरत आहे तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे धावा करण्यात सातत्य कमी पडत आहे. अशीच गत काहीशी चेतेश्वर पुजाराची होती. मात्र त्याने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ९१ धावांची आक्रमक खेळी करत टीकाकारांची तोंडे बंद केली.

उपकर्णधाराला अभय की देणार बळी? (INDvsENG 4th test D1 )

आता फलंदाजीत अजिंक्य रहाणेवर संघातून वगळले जाण्याची टांगती तलवार आहे. त्याच्या जागी दुसरा फलंदाज खेळवावा यासाठी संघ व्यवस्थापनावर दबाव आहे. आता संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अजिंक्यची जागा घेणाऱ्यांच्या यादीत सर्वात जास्त आघाडीवर आहे तो मुंबईचाच सूर्यकुमार यादव. त्याने टी२० आणि एकदिवसीय संघात आपली गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली आहे.

श्रीलंकेतील त्याच्या कामगिरीमुळे त्याला इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. मात्र त्याच्याकडे कसोटीतला अनुभव नाही. दुसऱ्या बाजूला सलामीवीर म्हणून संघात निवड झालेला मयांक अग्रवालही अजिंक्यची जागा घेऊ शकतो. त्याच्याकडे कसोटीत फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. दुसरीकडे इंग्लंडने आपला उपकर्णधार जोस बटलरला डच्चू दिला आहे आणि मोईन अलीला उपकर्णधार केले आहे. टीम इंडियाही हाच मार्ग अवलंबणार की अजिंक्यला अभय मिळणार?

प्रसिद्धच्या समावेशाने अश्विन पुन्हा बेंचवर?

दुसऱ्या बाजूला गोलंदाजीत तिसऱ्या कसोटीत इशांत शर्माने मोठी निराशा केली. दरम्यान तिसऱ्या कसोटीतच संघात चार वेगवान गोलंदाजांऐवजी अश्विनला खेळवण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. आता ओव्हलची खेळपट्टी फिरकीला साथ देते. त्यामुळे अश्विनच्या नावाची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मात्र सामन्याच्या आदल्या दिवशीच बीसीसीआयने संघ व्यवस्थापनाच्या आग्रही मागणीनंतर भारतीय संघात प्रसिद्ध कृष्णाचा समावेश केला. तो सध्या स्टँड बाय खेळाडू म्हणून इंग्लंडमध्ये संघासोबत आहे. तो सुरुवातीपासूनच संघासोबत सराव करत आहे. या समावेशामुळे संघ व्यवस्थापन पुन्हा अश्विनला बेंचवरच सजवून ठेवणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी किती येतो खर्च आणि हातात पडतात किती? 

Back to top button